

मुंबई : मंत्रालयातील आपल्या दालनात लिपिकाला लाच घेताना रंगेहात पकडले जाण्याचा प्रकार हा चुकीचाच आहे. माझ्यावर याची जबाबदारी असून या लाचखोरी प्रकरणाची पाळेमुळे जर माझ्यापर्यंत आली तर मी निश्चितच राजीनामा देईन, अशी भूमिका अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी मांडली. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही. तसेच याप्रकरणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
झिरवाळ यांच्या मंत्रालयातील दालनात ढेरंगे नावाचा लिपीक गुरुवारी संध्याकाळी ३५ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. थेट मंत्रालयात लाचखोरीचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्ष काँग्रेसने याप्रकरणी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना झिरवाळ यांनी लाचखोरी प्रकरणात भूमिका स्पष्ट केली.
लाच घेताना पकडला गेलेला ढेरंगे हा लिपीक म्हणून काम करतो. सुनावणीची कागदपत्रे बनविण्याचे काम त्याच्याकडे आहे. ढेरंगे मूळचे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे आहेत. त्यांना उसनवारी तत्वावर घेतले आहे. त्याला पाठिशी घालण्यात येणार नाही. घडलेला प्रकार अतिशय चुकीचा आहे. माझ्या मंत्री कार्यालयातील खासगी सचिव किंवा ओएसडी यांचा त्याच्याशी काही संबंध नाही, असे झिरवाळ म्हणाले.
याप्रकरणाची लिंक जर माझ्यापर्यंत आली तर मी निश्चितच राजीनामा देईन. माझ्या विरोधात कोणी हा कट रचला आहे, असे मला वाटत नाही. कारण मी कधीच काही चुकीचे केले नाही वा करतही नाही, असेही झिरवाळ म्हणाले.
झिरवाळांनी तत्काळ राजीनामा द्यावा - सपकाळ
अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या घटनेने भाजप महायुती सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याने या लाचखोरीची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मंत्री झिरवळांनी तत्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाने वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे. हे आणखी धक्कादायक आणि गंभीर आहे. त्यामुळे झिरवाळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. आपल्या कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरू असल्याचे समोर आल्यावर निष्पक्ष चौकशीसाठी झिरवाळ यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले.
गृह विभागाच्या परवानगीनंतरच ढेरंगेवर'एसीबी'ची कारवाई
अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील विभागाचा लिपीक राजेंद्र ढेरंगे याला ३५ हजारांची लाच स्वीकारताना गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी (एसीबी) रंगेहात पकडल्याने मंत्रालयात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ढेरंगेला पकडण्यासाठी ‘एसीबी’ने मंत्रालयात सापळा रचला होता. मात्र, गृह विभागाच्या परवानगीनंतरच ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी ढेरंगेवर कारवाई केली.
अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे मेडिकल दुकानाच्या अनेक तक्रारी येत असतात. अशाच एका प्रकरणात मेडिकल दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला होता. निलंबनाची कारवाई रद्द करण्यासाठी संबंधित मेडिकल दुकानदाराकडून प्रयत्न सुरू होते. दरम्यान, निलंबन रद्द करून देतो, असे म्हणत ढेरंगे याने ५० हजार रूपयाची मागणी केली होती. परंतु, लाच द्यायची नसल्याने तक्रारदाराने थेट ‘एसीबी’कडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.
मात्र, ढेरंगे हा मंत्रालयात काम करीत असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गृह विभागाकडे परवानगी मागण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. परवानगी मिळताच ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी सोमवारपासून ढेरंगेवर पाळत ठेवली होती. ढेरंगे लाच मागत असल्याचे निश्चित होताच गुरुवारी सापळा रचण्यात आला. या सापळ्यात ढेरंगे ३५ हजारांची लाच घेताना सहज सापडला.
निलंबनाची कारवाई
ढेरंगे हा मूळचा अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा कर्मचारी आहे. परंतु, तो मंत्र्यांच्या गावचा असल्याने त्याची उसनवारीवर झिरवाळ यांच्या मंत्री कार्यालयात बदली करण्यात आली होती. त्याच्याकडे विभागातील औषधांसंदर्भातील (ड्रग्ज) जबाबदारी देण्यात आली होती. त्याचाच गैरफायदा घेत ढेरंगेने तोडपाणी करण्याचा उपदव्याप केला. त्यांच्या या कृत्याबद्दल त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.