झिरवाळ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; मंत्रिपदावरून काढण्याची विरोधकांची मागणी

राज्याचे अन्न आणि औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाल्याने नवे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. झिरवाळ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
झिरवाळ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; मंत्रिपदावरून काढण्याची विरोधकांची मागणी
झिरवाळ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; मंत्रिपदावरून काढण्याची विरोधकांची मागणी
Published on

मुंबई : राज्याचे अन्न आणि  औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाल्याने नवे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. झिरवाळ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

झिरवाळ यांचा व्हिडीओ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांची तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी  केली, तर हा प्रकार महायुतीतील पक्षांमधील आपसातल्या गँगवॉरचा प्रकार आहे की काय, अशी शंका विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. यातील व्यक्तींच्या जवळच्या मंडळींनी ब्लॅकमेलिंगच्या हेतूने हा प्रकार उघड केला आहे की काय, असाही संशय त्यांनी नोंदवला.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात  रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला असला तरी त्यांच्याकडे  राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीचे अध्यक्षपद अद्याप कायम आहे. चाकणकर यांच्यानंतर झिरवाळांचा कथित प्रताप समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अद्याप यावर काहीही भाष्य केलेले नाही. सुनेत्रा पवार यांनी या दोघांनाही सर्व पदावरून मुक्त करावे, असे आवाहनही हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

गेल्या महिन्यात, आपल्या कार्यालयातील सहायकाला लाच घेताना पकडण्यात आल्याने झिरवळ वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मात्र त्याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.चौकटसुप्रिया सुळेंचे विधान चीड आणणारेदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा वारसा चालवत आहेत,  हे खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान दिशाभूल करणारे आणि चीड आणणारे आहे. डॉ.  दाभोलकर आणि फडवणीसांची तुलना होऊच शकत नाही. दोघांच्या विचाराचा वारसा आणि  मार्ग भिन्न आहे. त्यामुळे  सुळे यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in