बिल्डरांनी केला २० टक्के कोटा गिळंकृत; नाशिकमध्ये बनावट मोजणी नकाशांचा घोटाळा

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या नाशिकमधील २० टक्के योजनेतील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट मोजणी नकाशे तयार करून ४९ जमीनदार आणि बिल्डरांनी २० टक्के योजनेतील घरे गिळंकृत केली आहेत. या विरोधात नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिल्डरांनी केला २० टक्के कोटा गिळंकृत; नाशिकमध्ये बनावट मोजणी नकाशांचा घोटाळा
बिल्डरांनी केला २० टक्के कोटा गिळंकृत; नाशिकमध्ये बनावट मोजणी नकाशांचा घोटाळाप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या नाशिकमधील २० टक्के योजनेतील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट मोजणी नकाशे तयार करून ४९ जमीनदार आणि बिल्डरांनी २० टक्के योजनेतील घरे गिळंकृत केली आहेत. या विरोधात नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार ४ हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रावर उभारल्या जाणाऱ्या गृहप्रकल्पांमध्ये २० टक्के जागा अत्यल्प आणि अल्प घटकांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. ही घरे दुर्बल घटकातील नागरिकांना वितरित करण्यासाठी म्हाडाकडे सुपूर्द करण्यात येतात. त्यानुसार म्हाडा लॉटरीच्या माध्यमातून ही घरे सर्वसामान्य नागरिकांना वितरित करते. मात्र हीच घरे गिळंकृत केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी भूमी अभिलेख विभागाचे बिपीन काजळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नगरविकास विभागाचा नियम टाळण्यासाठी काही जमीनमालक, बिल्डर आणि त्यांचे सहकारी संगनमताने जमिनीचे कागदोपत्री तुकडे करून क्षेत्र ४ हजार चौरस मीटरपेक्षा कमी दाखविलयाचा आरोप आहे. म्हाडाने या प्रकल्पात शंका उपस्थित केल्याने जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशानुसार स्थापन समितीने म्हसरूळ, गंगापूर आणि चेहडी या भागातील १०८ प्रकरणांची चौकशी केली. त्यापैकी ४९ प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष मोजणी न करता मोजणी झाल्याचे दाखवून बनावट नकाशे तयार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

logo
marathi.freepressjournal.in