

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील भावली धरण परिसरात एका महिला पर्यटकाचा विनयभंग करून तिच्या कुटुंबावर गुंडांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी ९ जणांना अटक केली आहे. रविवारी धरण परिसरातील धबधब्यावर ही घटना घडली होती.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती तिचे पती, मुलगा, मुलगी, दीर आणि दोन पुतण्यांसह रविवारी भावली धरणाजवळील धबधबा पाहण्यासाठी गेली होती. तेथे दोन तरुणांनी महिलेला पाहून शिट्ट्या वाजवून तिची छेड काढण्यास सुरुवात केली. महिलेच्या कुटुंबीयांनी याला विरोध केला असता, हुल्लडबाजांनी त्यांना बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर संशयितांनी महिलेचे कपडे फाडून तिचा मोबाईल हिसकावून घेतला. पतीने मोबाईल परत घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅमची सोन्याची साखळी जबरीने चोरून त्यांना मारहाण करण्यात आली. पीडित कुटुंबीय तिथून कारने निघून जात असताना, संशयितांनी कार आणि दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला. पुढे जाऊन त्यांची गाडी अडवण्यात आली.
कारमधून उतरलेल्या ८ ते ९ जणांच्या टोळीने हातात काठ्या, लोखंडी रॉड आणि बेसबॉल बॅट घेऊन पीडित कुटुंबाच्या गाडीची काच फोडली आणि महिलेला जबरदस्तीने बाहेर ओढले. तेथे पुन्हा तिचा विनयभंग करण्यात आला आणि एका आरोपीने तिच्या डोक्यावर बेसबॉल बॅटने वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने तो वार चुकवला. या भयानक प्रसंगातून कसेबसे निसटून कुटुंबीयांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि घटनेचे व्हिडीओ फुटेज पोलिसांच्या स्वाधीन केले.
याप्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगळवारी ९ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
अटक करण्यात आलेले सर्व आरोपी गिरणारे, नांदगाव साडो, माणिकखांब आणि आसपासच्या परिसरातील आहेत. व्हिडीओ फुटेजवरून आणखी ६ ते ७ आरोपींची ओळख पटली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी भोईर नावाच्या एका मुख्य आरोपीवर २०२०-२१ मध्ये हत्येचा गुन्हा दाखल आहे.