

नाशिक : नाशिकमधील कंपनीत घडलेल्या लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणाचा निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शहरात भव्य बाइक रॅली काढण्यात आली. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ शहरातील वातावरण तापलेले असतानाच हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी मोठी बाइक रॅली काढली. या रॅलीत शेकडो महिला, तरुणी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले असतानाही आंदोलकांनी उन्हाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला.
धर्मांतराच्या कथित घटनेचा गंभीर प्रकार ज्या कंपनीत घडल्याचा आरोप आहे, त्या ठिकाणाहून ही रॅली सुरू झाली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली. रॅलीदरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत संबंधित प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवला. धर्मांतराच्या कथित षडयंत्राविरोधात कठोर कारवाईची मागणी यावेळी सातत्याने करण्यात आली.
रणरागिणींच्या बाइक रॅलीचे स्वरूप
या आंदोलनात महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. अनेक तरुणी आणि महिला दुचाकीवरून सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे या रॅलीला रणरागिणींची बाइक रॅली, असे स्वरूप प्राप्त झाले. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनीही या रॅलीत सहभाग घेत आंदोलकांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
आंदोलकांची प्रमुख मागणी म्हणजे पीडित महिलांना तत्काळ न्याय मिळावा आणि अटक करण्यात आलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी होती.
या प्रकरणामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्येही संतापाची भावना निर्माण झाल्याचे दिसून आले. विविध हिंदुत्ववादी संघटना या मुद्द्यावर एकत्र आल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. नाशिकमधील विविध हिंदुत्ववादी संघटना या मुद्द्यावर एकत्र आल्या असून, शहराच्या सुरक्षेचा प्रश्न त्यांनी लावून धरला आहे. रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.
घोषणाबाजीमुळे वातावरण तणावपूर्ण
रॅलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलीस तैनात करण्यात आले होते. आंदोलकांची संख्या मोठी असतानाही रॅली शांततेत पार पडली, मात्र घोषणाबाजीमुळे वातावरण तणावपूर्ण राहिले. दरम्यान, या आंदोलनामुळे नाशिकमधील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणाच्या चौकशीला अधिकच वेग मिळाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे. प्रशासनावरही या प्रकरणात जलद आणि ठोस कारवाई करण्याचा दबाव वाढताना दिसत आहे.