

लासलगाव : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील शिवाजी नगर परिसरात शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात घडला. एका कार्यक्रमानंतर घरी परतत असताना कुटुंबाची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरीत कोसळली. या दुर्दैवी घटनेत ६ मुलांसह एकाच कुटुंबातील ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दिंडोरी तालुक्यातील इंदोर गावातील दरगुडे कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. मृतांची ओळख पटली असून यामध्ये सुनील दत्तू दरगुडे (३२), त्यांची पत्नी रेश्मा, आशा अनिल दरगुडे (३२) आणि ७ ते १४ वयोगटातील ५ मुली व एका ११ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. संबंधित कार थेट विहिरीत पडल्याने प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दुःखाचे सावट पसरले असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन क्रेन आणि पोहणाऱ्यांच्या मदतीने मध्यरात्रीच्या सुमारास कार आणि मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, ही विहीर सार्वजनिक ठिकाणी असून तिला अत्यंत कमी उंचीची संरक्षक भिंत होती. अपघातानंतर सर्व मृतदेह दिंडोरी येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले असून याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अंधारामुळे आणि विहिरीत पाणी असल्यामुळे बचावकार्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या.
घटना हृदयद्रावक : सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी ही घटना अत्यंत हृदयद्रावक व वेदनादायी असल्याचे म्हटले आहे. मंत्री नरहरी झिरवाळ मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले असता संतप्त नागरिकांनी त्यांना घेराव घालत जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली. झिरवाळ रुग्णालयात पोहोचताच नागरिकांनी तक्रारींचा भडिमार केला. विहिरीभोवती संरक्षण भिंत किंवा कठडा नसणे, रस्त्याचे अपूर्ण काम आणि क्लास व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा यावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला
विहीर मालकावर गुन्हा दाखल - नरहरी झिरवाळ
या घटनेबाबत माध्यमांशी बोलताना नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरीसाठी हा काळा दिवस आहे, असे म्हणत शोक व्यक्त केला. एकाच कुटुंबातील इतक्या लोकांचा मृत्यू होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. विहीर मालकाने घराला कंपाउंड केले, पण विहिरीभोवती सुरक्षा का नव्हती, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच नगरपालिकेने रस्ता विहिरीपर्यंत नेऊन तिथेच संपवला, मात्र आवश्यक संरक्षण भिंत उभारली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, विहीर मालकाच्या नातेवाईकांनीही आपली बाजू मांडली. अॅड. विक्रम राजे यांनी सांगितले की, ही विहीर १९७२ पासून अस्तित्वात असून दुष्काळाच्या काळात गावासाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत ठरली होती. विहिरीवर पूर्वी जाळी आणि अँगल बसवण्यात आले होते, मात्र ते कोणीतरी काढून नेल्याचा दावा त्यांनी केला.
दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश
राज्य आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. ही विहीर तातडीने बुजवण्याचे निर्देश त्यांनी दिले असून नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या अपघातावर शोक व्यक्त केला असून ही घटना अत्यंत हृदयद्रावक आणि वेदनादायी असल्याचे म्हटले आहे.
मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शालेय विद्यार्थ्यांचे वाहन विहिरीत कोसळून झालेल्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. तसेच मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या दुर्दैवी अपघाताबद्दल मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी शनिवारी दिली.
संपूर्ण दिडोरी परिसरात शोककळा
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे काम केले. संबंधित कार ही मारुती सुझुकी अर्टिगा असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी परिसरात शोककळा पसरली आहे.