
नाशिक : पर्यावरण प्रेमी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सोमवारी सकाळी घरापासून ते कार्यालयापर्यंत पिंक ई रिक्षा लाभार्थी महिलेच्या रिक्षातून प्रवास केला.
जिल्हा प्रशासनात वेगवेगळे उपक्रम राबवीत जिल्हा प्रशासन गतिमान आणि गरजू नागरिकांना वेळेत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी शर्मा हे नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांनी शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांचा नागरी सेवा दिनी नवी दिल्ली येथे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला आहे. याशिवाय एक जिल्हा- एक उत्पादन या योजनेची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांचा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
शर्मा हे महिन्यातून किमान एक दिवस वाहन न वापरता ते कार्यालयात येतात. त्यासाठी कधी पायी, तर कधी सायकलचा वापर करतात. त्यानुसार ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजे आज त्यांनी वाहनाऐवजी पिंक रिक्षाची निवड केली. राज्य शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी पिंक ई रिक्षा योजना आणली आहे. त्यानुसार जिल्ह्यात एक हजार महिलांना जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून पिंक रिक्षा देण्याचे नियोजन आहे.
जिल्हाधिकारी शर्मा यांनी वैष्णवी साकोरे ही भगिनी चालवीत असलेल्या पिंक ई रिक्षातून जिल्हाधिकारी निवास ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा प्रवास केला. यावेळी त्यांनी रिक्षा चालविणाऱ्या भगिनीशी संवाद साधला. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाणे उपस्थित होते.
"पर्यावरण संवर्धन ही सामूहिक जबाबदारी आहे. या जबाबदारीचा एक भाग म्हणून महिन्यातील पहिल्या सोमवारी वाहन न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामागे प्रदूषण कमी करणे, पर्यावरण संवर्धन,इंधन बचत ही उद्दिष्टे आहेत. यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होण्यास मदत होणार आहे."
जलज शर्मा, जिल्हाधिकारी, नाशिक
"जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी त्यांचे निवासस्थान ते कार्यालय पर्यंतचा प्रवास आज माझ्या रिक्षातून केला. हा माझा बहुमान असून त्यामुळे माझे मनोबल वाढण्यास मदत झाली आहे."
वैष्णवी उमाकांत साखरे, पिंक ई रिक्षा लाभार्थी महिला