
नाशिक : गेल्या महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या नाशिक-दिल्ली विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच, आता दिल्लीला प्रवास करू इच्छिणाऱ्या नाशिककरांसाठी मोठी 'गुड न्यूज' आहे. येत्या दोन महिन्यांत नाशिक-दिल्ली विमान प्रवासासाठी आणखी एक अतिरिक्त सेवा सुरू होणार असून, यासंदर्भातील औपचारिक घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही दिवसांत विस्कळीत झालेले नाशिकचे हवाई वेळापत्रक आता खऱ्या अर्थाने सुरळीत झाले आहे. सध्या नाशिकहून इंडिगो (Indigo) कंपनी ही विमानसेवा पुरवत आहे. याव्यतिरिक्त, गेल्या सहा महिन्यांपासून विस्कळीत झालेली नाशिक-जयपूर (इंदूरमार्गे) ही विमानसेवा देखील लवकरच सुरळीत होणार आहे. नाशिक ते इंदूर
प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे, तसेच इंदूरहून पुढे कनेक्टिंग फ्लाइट्स उपलब्ध असल्याने नाशिककरांना दुहेरी फायदा होणार आहे.
सध्या सुरू असलेली विमानसेवा
दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, गोवा
या शहरांसाठी प्रयत्न सुरू
इंदूर-जयपूर, कोलकाता, चेन्नई, वाराणसी, लखनऊ, पंजाब, राजस्थान
नाशिक-दिल्ली विमान प्रवासासाठी अतिरिक्त सेवा लवकरच सुरू होणे निश्चित झाले आहे आणि त्याची औपचारिक घोषणा लवकरच होईल. अलीकडे नाशिकचे महत्त्व सर्वार्थाने वाढले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक देशातील सर्व प्रमुख शहरांशी 'कनेक्ट' राहावे, यासाठी 'निमा'च्या एव्हीएशन समितीचे अविरत प्रयत्न सुरू आहेत.
मनीष रावळ, उपाध्यक्ष 'निमा' एव्हीएशन समिती, नाशिक
रात्रीच्या वेळी असणार नवी फ्लाइट
प्राप्त माहितीनुसार, ही नवी नाशिक-दिल्ली विमानसेवा रात्रीच्या वेळी असण्याची शक्यता आहे. ओझर विमानतळावरून रात्री निघालेले विमान काही तासांत दिल्ली गाठणार असल्याने, प्रवाशांना दिवसाची कामे आटोपून रात्री प्रवास करणे आणि वेळेत परतणे सोयीचे होणार आहे.