नाशिक-दिल्ली विमानसेवेला नवे बळ; खासदारांच्या पाठपुराव्याला यश, दिवसातून २ उड्डाणे !

नाशिककरांची दीर्घकाळापासूनची मागणी अखेर पूर्णत्वास येत असून, खासदार राजाभाऊ वाजे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता नाशिकहून दिल्लीला जाण्यासाठी दिवसभरातून दोन विमान उड्डाणे उपलब्ध होणार आहेत.
नाशिक-दिल्ली विमानसेवेला नवे बळ; खासदारांच्या पाठपुराव्याला यश, दिवसातून २ उड्डाणे !
Published on

नाशिक : नाशिककरांची दीर्घकाळापासूनची मागणी अखेर पूर्णत्वास येत असून, खासदार राजाभाऊ वाजे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता नाशिकहून दिल्लीला जाण्यासाठी दिवसभरातून दोन विमान उड्डाणे उपलब्ध होणार आहेत.

खासदार वाजे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयात वेळोवेळी पत्रव्यवहार, मंत्री व अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन नाशिक-दिल्ली विमानसेवा हवाई कंपन्यांसाठी कशी फायदेशीर ठरू शकते हे प्रभावीपणे पटवून दिले होते. इतकेच नव्हे, तर २१ ऑगस्ट रोजी संसदेच्या अधिवेशनादरम्यान लोकसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातूनही त्यांनी हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता.

खासदार वाजे यांनी २१ ऑगस्ट रोजी लोकसभेत तारांकित प्रश्नाद्वारे उड्डाणाची कमी झालेली संख्या, प्रवाशांना होणाऱ्या अडचणी आणि नाईट स्लॉटसाठी समन्वय आदी विषयांवर प्रकाश टाकून नाशिकच्या मागणीला अधिवेशनात आवाज बुलंद केला होता. खासदार राजाभाऊ वाजे यांनी नवीन विमान उड्डाण सुरू केल्याबद्दल नागरी उड्डाण मंत्रालय तसेच इंडिगो एअरलाईनचे आभार मानले आहेत. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, याही विमानसेवेला नाशिककर भरघोस प्रतिसाद देऊन यशस्वी करतील.

आकडेवारीसह मागणी यशस्वी

खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिकहून दिल्ली तसेच इतर ठिकाणी सुरू असलेल्या विमान उड्डाणांतील वाढत्या प्रवासी संख्येची आकडेवारी वरिष्ठ स्तरावर सादर केली. मागणीच्या अनुषंगाने अधिकच्या उड्डाणांचा पुरवठा करणे किती आवश्यक आहे हे त्यांनी सिद्ध केले. परिणामी, नागरी उड्डाण मंत्रालय आणि संबंधित कंपन्यांनी या सेवेसाठी सकारात्मकता दर्शवली.

सायंकाळी दुसरे उड्डाण सुरू

ओझर विमानतळावरून दिल्लीसाठी दिवसातून दोनवेळा उड्डाण होणार आहे. यापूर्वी सकाळी हे उड्डाण उपलब्ध होते. आता सायंकाळी ६:२५ वाजता दिल्ली येथून नाशिकसाठी दुसरे उड्डाण सुरू होणार आहे. या दुहेरी सेवेमुळे व्यापारी, उद्योजक, शासकीय अधिकारी, व्यावसायिक आणि विद्यार्थी यांची मोठी सोय होणार आहे. तसेच, पर्यटकांच्या दृष्टिकोनातून देखील सायंकाळची ही वेळ अतिशय योग्य असल्याचे जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in