
आपल्या बँक खात्यातील रक्कम बेहिशोबी तर केलेले व्यवहार संशयास्पद असल्याची बतावणी करून सायबर भामट्यांनी तिघांना सुमारे १ कोटींचा गंडा घातला आहे. 'डिजिटल अरेस्ट'च्या या प्रकाराने नाशिक शहरात खळबळ माजली आहे. नीरज बापट, जयश्री जोशी आणि वृषाली पन्हाळे असे फसगत झालेल्या तिघांची नवे आहेत. यापैकी बापट हे विधिज्ञ असल्याची माहिती मिळत आहे.
प्राप्त माहितीनुसार, सायबर भामट्यांनी तिघांना व्हिडीओ कॉल करून आम्ही इडी, सीबीआय, कस्टम विभागांतील अधिकारी बोलत असल्याचे सांगत त्यांना घाबरवून सोडले. ८ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत एकूण भामट्यांनी सोळा वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संबंधित व्यक्तींना व्हिडीओ कॉल केल्याची नोंद आहे. तुमच्या बँक खात्यातील रक्कम बेहिशोबी तर केलेले व्यवहार संशयास्पद असल्याचे सांगत भामट्यांनी कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली. यासाठी बनावट अटक वॉरंटही दाखवण्यात आले. या संकटातून सुटण्यासाठी आम्ही सांगतो तसे करा, अशी धमकी देण्यात आली. व्हिडीओ कॉल वरून बनावट पोलीस ठाणे, पोलीस अधिकारी आणि कागदपत्रे दाखवून भामट्यांनी या तिघांची भीती अधिकच वाढवली.
पैसे मिळाल्यानंतर मोबाईल क्रमांक बंद
यानंतर या तिघांकडून विविध बँक खात्यांत पैसे टाकण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार, नीरज बापट यांनी ५० लाख, जयश्री जोशी ३६ लाख ९१ हजार आणि वृषाली पन्हाळे ९ लाख ३८ हजार अशी जवळपास ९६ लाख २९ हजारांची रक्कम उकळण्यात आली. पैसे मिळाल्यानंतर भामट्यांनी मोबाईल क्रमांक बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिघांनी सायबर पोलिसांत धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.