Nashik : दिंडोरीस्थित राष्ट्रीय तिरंदाजाचा कोटा स्टेशनवर अपघाती मृत्यू; अर्जुन सोनवणे याच्या निधनाने क्रीडाविश्वात हळहळ

Nashik : दिंडोरीस्थित राष्ट्रीय तिरंदाजाचा कोटा स्टेशनवर अपघाती मृत्यू; अर्जुन सोनवणे याच्या निधनाने क्रीडाविश्वात हळहळ

तिरंदाजीतील राष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आणि दिंडोरीचा भूमिपुत्र अर्जुन सोनवणे (२०) याचा राजस्थानातील कोटा स्टेशनवर अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Published on

नाशिक : तिरंदाजीतील राष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आणि दिंडोरीचा भूमिपुत्र अर्जुन सोनवणे (२०) याचा राजस्थानातील कोटा स्टेशनवर रेल्वेतून उतरताना फलाट आणि गाडीच्या सापटीत पडून अपघाती मृत्यू झाला. शनिवारी ( दि. १ ) रात्री ही दुर्घटना घडली. अर्जुन हा दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याच्या अपघाती मृत्यूने क्रीडाविश्व हळहळले आहे.

प्राप्त माहितीनुसार, अर्जुन पंजाबमधील भटिंडा येथे तिरंदाजीच्या आंतरविद्यापीठीय सामन्यात भाग घेण्यासाठी सहकाऱ्यांसह गेला होता. स्पर्धेनंतर सर्वजण शकूर बस्ती-मुंबई सेंट्रल रेल्वेने एसी स्पेशल डब्यातून मुंबईला परत येत होते. रेल्वे शनिवारी रात्री पावणेनऊच्या दरम्यान कोटा स्टेशनवर पोहोचली. त्यावेळी काही सदस्य उतरण्यासाठी दरवाजाकडे आले. गाडीचा वेग कमी होत असताना अर्जुनचा पाय घसरला आणि रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये तो अडकला. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास त्याने शेवटचा श्वास घेतला. राज्य आणि राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धांमध्ये आठ सुवर्णपदके जिंकली होती. या घटनेने क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी अर्जुनच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in