नाशिक : मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून शिलापूर येथे सीपीआरआय अर्थात नाशिक इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब साकारण्यात आली आहे. या लॅबचे बुधवारी (दि.१० ) दुपारी २ वाजता केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे.
नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत इलेक्ट्रिकलचे सुमारे साडेचारशेहून अधिक लघु आणि माध्यम उद्योग आहेत. त्यांना इलेक्ट्रिकल पॅनल्स आणि इतर वीज उपकरणांच्या निर्मितीनंतर टेस्टिंग करण्यासाठी सद्या भोपाळ आणि बंगळूरू येथे जावे लागते. त्यामुळे नाशिकमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब स्थापन करण्याची नाशिकच्या उद्योजकांची मागणी होती. याबाबत तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या उद्योजकांना सदर लॅब स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ व नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे नाशिकमध्ये इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब मंजूर करण्यात आली. शंभर एकर जमिनीमध्ये हा प्रकल्प साकारण्यात आलेला आहे.
शिलापूर येथील इलेक्ट्रीक टेस्टिंग लॅब हा प्रकल्प नाशिकमधील विद्युत अभियांत्रिकी क्षेत्राला कलाटणी देणारा असा प्रकल्प आहे. केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान म्हणजेच सेन्ट्रल पॉवर इंस्टिट्युट या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील खात्याने पश्चिम भारतात हा इलेक्ट्रीक टेस्टिंग प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला.
सीपीआरआय सुरक्षा, संशोधन बहाल करणारी संस्था..
सीपीआरआय ही केवळ एक प्रयोगशाळा नाही, तर ती विद्युत सुरक्षेची, संशोधनाची आणि उद्योगविश्वाला दिशा देणारी एक महत्वाची संस्था आहे. जगभरात विद्युत उपकरणांची मागणी प्रचंड वाढत असताना, त्यांच्या गुणवत्तेची खात्री मिळवून देणे ही मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी आता आपल्या नाशिकनेही पेलण्यास सुरुवात केली आहे.