नाशिकमध्ये पाणीकपातीचे संकट

लांबलेल्या मान्सूनमुळे राज्यभर पाणीटंचाईचे संकट गंभीर बनत चालले असताना नाशिक महापालिका प्रशासनाने शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
नाशिकमध्ये पाणीकपातीचे संकट
नाशिकमध्ये पाणीकपातीचे संकट
Published on

नाशिक : लांबलेल्या मान्सूनमुळे राज्यभर पाणीटंचाईचे संकट गंभीर बनत चालले असताना नाशिक महापालिका प्रशासनाने शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा देशभरात किमान दहा टक्के पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार नाशिकचे संपर्क सचिव एकनाथ डवले यांनी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन येत्या ३१ ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश दिले आहेत.

या नियोजनांतर्गत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून शेती व अन्य कमी गरजेच्या कामांसाठी धरणातून आवर्तन न सोडण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने याच अनुषंगाने संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी पाणीकपातीचे पाऊल उचलले असून पाणीपुरवठा विभागाने शहरातील या कपातीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आणला आहे.

हा प्रस्ताव मंजुरीसाठी आयुक्त आणि महापौर यांच्यासमोर सादर केला जाणार असून त्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. मात्र वेळेत आणि पुरेसा पाऊस न झाल्यास आगामी काळात पाणीकपातीचे प्रमाण आणखी वाढू शकते, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या संपूर्ण परिस्थितीमुळे नाशिककरांवर आतापासूनच पाणी अत्यंत जपून वापरण्याची वेळ आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in