

नाशिक : नाशिकमध्ये बनावट नोटा छापण्याचा सुरू असलेला मोठा अड्डाच पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि उपकरणे जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
नाशिक ग्रामीण आणि नाशिक शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. त्र्यंबकेश्वर तालुक्यात तळेगाव येथील एका बंगल्यात बनावट भारतीय चलनी नोटा छापण्याचे काम सुरू असल्याचे उघडकीस आले.
या कारवाईत पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. बनावट नोटा छापण्याच्या या रॅकेटमध्ये प्रत्येक आरोपीची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास सुरू आहे. तसेच हा अड्डा किती दिवसांपासून सुरू होता, आतापर्यंत किती नोटा छापण्यात आल्या आणि त्या बाजारात चलनात आणल्या गेल्या आहेत का, याचाही तपास केला जात आहे.
बनावट नोटा तयार केल्यानंतर त्या नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत अथवा इतर जिल्ह्यांत चलनात आणल्या गेल्या आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींच्या चौकशीतून या रॅकेटच्या वितरण साखळीची माहिती मिळण्याची शक्यता आहे.तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे कागद, छपाईची साधने आणि इतर साहित्य आरोपींना कोठून मिळाले, याचाही तपास सुरू आहे.