नाशिकचा पूर जळगावच्या पथ्यावर! गिरणा धरणाचा पाणीसाठा वाढला

नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने गिरणा नदीला पूर आला. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले असले तरी हा पूर जळगाव जिल्ह्यासाठी फायदेशीरच ठरला आहे.
नाशिकचा पूर जळगावच्या पथ्यावर! गिरणा धरणाचा पाणीसाठा वाढला
Published on

जळगाव : नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने गिरणा नदीला पूर आला. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले असले तरी हा पूर जळगाव जिल्ह्यासाठी फायदेशीरच ठरला आहे. पाण्यासाठी जिल्ह्यातील सात तालुके अवलंबून असलेल्या गिरणा धरणाच्या साठ्यात यामुळे वाढ होऊन तो साठा ४० टक्के झाला आहे. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण म्हणून गिरणा नदीवरील गिरणा धरण ओळखले जाते. या धरणावर जळगाव जिल्ह्यातील सात तालुके अवलंबून आहेत. तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिका, नांदगाव नगरपालिका, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगावसह दहा पालिका चाळीसगाव एमआयडीसी, १३० पाणी पुरवठा योजना, १७४ गावे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. या धरणाची साठवण क्षमता १८.४७ टीएमसी एवढी असून हे धरण १९६५ पासून केवळ बारा वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे. पावसाळ्याला सुरवात होऊन देखील आतापर्यंत धरणात केवळ ११ टक्के पाणीसाठा होता. या धरणाच्या वरच्या बाजूला नाशिक जिल्ह्यात पाच धरणे बांधली गेली आहेत.

त्यामुळे ही धरणे पूर्ण भरल्यानंतरच गिरणा धरणात पाण्याची आवक सुरू होते. नाशिक जिल्ह्यात नुकत्याच आलेल्या पुरामुळे गिरणा धरणावरील पाचही धरणे भरली गेल्याने त्यातून पाणी सोडण्यास सुरूवात झाली. परिणामी गिरणा धरणात पाणी येण्यास सुरुवात होऊन दोन दिवसांत गिरणा धरणात ४० टक्के पाणीसाठा झाला असल्याचे गिरणा पाटबंधारे विभागचे कार्यकारी अभियंता देवेंद्र अग्रवाल यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in