

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार असून त्यांच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी गोदावरी नदीकाठ परिसराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात येत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डीएमएक्स पिक्सेल थ्रीडी मॅपिंगच्या माध्यमातून परिसराला नवे भव्य स्वरूप देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. धार्मिक परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक प्रकाशयोजना यांचा सुंदर संगम या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.
रामकुंडावर भव्य व्यासपीठ; प्रशासनाची लगबग
गोदावरीच्या रामकुंड परिसरात ध्वजारोहण सोहळा आणि गोदा महाआरतीसाठी भव्य व्यासपीठांची उभारणी करण्यात येत आहे. परिसरातील मंदिरांची रंगरंगोटी, घाटांचे सुशोभीकरण, विद्युत रोषणाई आणि कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या मार्गांची व्यवस्था यावर भर देण्यात आला आहे. सोहळ्यासाठी नागरिकांना बसण्याची व्यवस्था, कार्यक्रमाचे थेट दर्शन घडविण्यासाठी स्क्रीन तसेच गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
परिसरातील दुकाने, प्रमुख रस्ते बंद
दरम्यान, ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध नियोजनात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. सोहळ्याच्या वेळी मोठ्या संख्येने भाविक, साधू-महंत, मान्यवर आणि नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन परिसरातील दुकाने बंद ठेवणे तसेच प्रमुख रस्ते कार्यक्रमाच्या तीन दिवस आधीच वाहतुकीसाठी बंद करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. बाजारपेठांमधील दैनंदिन व्यवहारांवर परिणाम या निर्बंधांमुळे रामकुंड, गोदावरी घाट आणि आसपासच्या बाजारपेठांमधील दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. गर्दीचे व्यवस्थापन, सोहळ्याच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था राखणे आणि आपत्कालीन सेवांसाठी मार्ग मोकळे ठेवणे, या उद्देशाने वाहतूक व व्यापारी हालचालींवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.
भाविकांसाठी विशेष आकर्षण
आधुनिक प्रकाशतंत्रज्ञानाच्या साहाय्याने गोदाकाठ परिसर उजळून निघणार आहे. डीएमएक्स पिक्सेल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रकाशयोजनेचे नियंत्रित संचालन, रंगांची आकर्षक उधळण आणि थ्रीडी मॅपिंगद्वारे दृक्-श्राव्य सादरीकरण करण्याची संकल्पना या सोहळ्याच्या भव्यतेत भर घालणारी ठरू शकते. ऐतिहासिक मंदिरे, गोदावरीचा घाट आणि धार्मिक वातावरण यांची सांगड घालणारी प्रकाशयोजना भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरण्याची अपेक्षा आहे.
शनिवारी ध्वजारोहण; गोदा महाआरतीची तयारी
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शुभारंभ येत्या शनिवारी ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याने होणार आहे. रामकुंड येथे दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी ध्वजारोहणाचा नियोजित मुहूर्त आहे. राष्ट्रपती मुर्मू यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्याच दिवशी सायंकाळी गोदावरी महाआरतीचेही आयोजन करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा, वाहतूक, पार्किंग आणि गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात येत आहे.