नाशिक जिल्ह्यातून द्राक्षांची विक्रमी निर्यात; १.५७ लाख टन द्राक्ष रवाना, युरोपियन देशांचा मोठा वाटा

नाशिक जिल्ह्याच्या द्राक्षाने यंदाही आपली गोडीची छाप आंतरराष्ट्रीय स्तरावर कायम राखली आहे. द्राक्ष हंगामात अवकाळी पावसाचे संकट, रोगांचा प्रादुर्भाव आणि हवामानातील चढ-उतार अशा विविध परिस्थितीतही द्राक्ष निर्यातीचा भक्कम पल्ला गाठण्यात नाशिक जिल्ह्याला यश आले आहे.
नाशिक जिल्ह्यातून द्राक्षांची विक्रमी निर्यात; १.५७ लाख टन द्राक्ष रवाना, युरोपियन देशांचा मोठा वाटा
Published on

हारून शेख/लासलगाव

नाशिक जिल्ह्याच्या द्राक्षाने यंदाही आपली गोडीची छाप आंतरराष्ट्रीय स्तरावर कायम राखली आहे. द्राक्ष हंगामात अवकाळी पावसाचे संकट, रोगांचा प्रादुर्भाव आणि हवामानातील चढ-उतार अशा विविध परिस्थितीतही द्राक्ष निर्यातीचा भक्कम पल्ला गाठण्यात नाशिक जिल्ह्याला यश आले आहे. नाशिक जिल्ह्यातून या हंगामात तब्बल १.५७ लाख टन द्राक्षांची निर्यात झाली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत स्थिर आहे. यामध्ये युरोपियन देशांचा मोठा वाटा आहे. निर्यातीच्या आकडेवारीनुसार, युरोपियन देशांना एकट्या नाशिक जिल्ह्यातून १.१० लाख टन द्राक्षांची निर्यात झाली, तर बिगर युरोपियन देशांकडे सुमारे ४७ हजार टन द्राक्षे पाठवण्यात आली. यामध्ये नेदरलँड्स, जर्मनी, इंग्लंड, बेल्जियम, रशिया, दुबई, बांगलादेश आणि मलेशिया यांचा समावेश आहे.

नाशिकची द्राक्ष आता केवळ फळ नाही, तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा ब्रँड बनू लागली आहे. हवामानातील बदल, जागतिक स्पर्धा आणि जागतिक बाजारात टिकणारे ‘नाशिक ग्रेप्स’ म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचा ब्रँड ठरत आहे. भारताच्या फळ निर्यातीमध्ये द्राक्षांनी आपले अग्रस्थान पुन्हा सिद्ध केले आहे. संपूर्ण देशातील द्राक्ष निर्यातीमध्ये नाशिक जिल्ह्याचा हिस्सा सर्वाधिक आहे.

नाशिक जिल्ह्यात निफाड, दिंडोरी, चांदवड, बागलाण, कळवण या तालुक्यांमध्ये द्राक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर उच्च दर्जाचे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन होत असल्यामुळे निर्यातक्षम फळांचा पुरवठा सातत्याने शक्य होतो. याचाच परिणाम म्हणून द्राक्ष निर्यातीत वाढ होत आहे.

नाशिक जिल्ह्याने द्राक्ष निर्यातीमध्ये सलग दुसऱ्या वर्षी स्थैर्य टिकवले आहे. हवामानातील अनिश्चितता, जागतिक बाजारपेठेतील स्पर्धा आणि वाहतूक अडथळे यावर मात करत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर ही कामगिरी केली आहे. शासनाकडून लॉजिस्टिक सुविधा, थेट निर्यात साखळी आणि शीतगृह साठवणूक केंद्रांची गरज यामुळे आगामी काळात द्राक्ष निर्यातीला आणखी गती मिळू शकते.

- संजय गवळी, द्राक्ष उत्पादक शेतकरी

मे महिन्यातील बिगर मोसमी पाऊस आणि जून महिन्यानंतर प्रत्यक्ष मान्सूनला सुरुवात झाल्यापासून सततच्या पावसामुळे द्राक्ष बागांवर दररोज फवारणी करावी लागत आहे. ढगाळ व पावसाळी वातावरण यामुळे द्राक्षबागा वाचवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास पुढील द्राक्ष हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण होत आहे.

- राजा बाबा होळकर, द्राक्ष उत्पादक

खराब वातावरणामुळे शेतकरी हतबल

सतत पाऊस बरसत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या द्राक्षबागा वाचविण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागत आहे. दररोज पडत असणाऱ्या पावसामुळे सबकेन झालेल्या द्राक्ष बागांच्या कोवळ्या फूटींवर करपा व डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे चालू वर्षी द्राक्ष बागांच्या काडीमध्ये फळधारणा होण्याची शक्यता खूपच कमी आहे. द्राक्ष बागांची पाने सप्टेंबर छाटणीपर्यंत टिकावी, या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना द्राक्षबागेला दररोज फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे द्राक्ष बागांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ तयार झाला आहे. ट्रॅक्टरद्वारे फवारणी करणे देखील अवघड होत आहे. दोन दोन ट्रॅक्टरद्वारे फवारणी करावी लागत आहे. यामुळे नको त्या द्राक्षबागा अशी मनस्थिती द्राक्ष बागायतदार उत्पादकांची झाली असून द्राक्ष बागांवर काही भागात कुऱ्हाड चालविण्याचा विचार शेतकरी करीत आहे.

२८,९६४ द्राक्ष उत्पादकांची निर्यातीसाठी नोंदणी

यावर्षी नाशिक जिल्ह्यातून २८,९६४ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्षासाठी नोंदणी केली. जिल्ह्यात एकूण द्राक्ष उत्पादन क्षेत्र ५८,३६७ हेक्टर इतके आहे. या हंगामात द्राक्षांना मिळालेला दरही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला. फेब्रुवारी ते मार्च दरम्यान प्रति किलो ७५ ते ११० रुपये दर मिळाला, मागील वर्षाच्या ५५ ते ८५ रुपयेच्या तुलनेत अधिक होता.

logo
marathi.freepressjournal.in