
नाशिक : पतीने पत्नीचे अश्लील व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल केल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पती महाशयाने पत्नीला ब्लॅकमेल करत तिला डान्सबारमध्ये नाचण्यास भाग पाडण्यात आल्याचे तक्रारीत म्हटल्याने पोलिसही चक्रावले आहेत.
नाशिकच्या पंचवटीतील हिरावाडी परिसरात या घटनेची उकल झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपी पतीने आपल्या पत्नीला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर पतीने स्वत:च्या मोबाईलमध्ये घरात पत्नीचे अश्लील व्हिडिओ काढले.
पत्नी शुद्धीवर आल्यानंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आरोपी पतीने दिली. हे धमकीसत्र कायम ठेवत पतीने वेळोवेळी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा पत्नीने आरोप केला आहे. शिवाय, अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पतीने आपल्याला जबरदस्तीने डान्सबारमध्ये नाचण्यास भाग पडल्याचा गंभीर आरोपही पत्नीने केला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलिसांत पती आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.