नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील लेट बी. पी. ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहलीची बस पुणे–बेंगळुरू महामार्गावर साताऱ्यातील कराडजवळ वाठार गावच्या हद्दीत तब्बल २० फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये ४० ते ४५ विद्यार्थी आणि शिक्षक होते.
अपघाताचा आवाज होताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी थरारक प्रयत्न करण्यात आले. दुर्घटनेत चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून पंधरापेक्षा अधिक विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ऋषिकेश पाचोरकर, प्रज्वल माहेर, सार्थक चव्हाण, पीयूष काळे अशी गंभीर जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.
या विद्यार्थ्यांची स्थिती गंभीर असून सर्व जखमींना तत्काळ कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सहलीचा आनंद घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर क्षणात संकट कोसळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा सातारा प्रशासनासोबत संवाद ..
दरम्यान, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सातारा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. तसेच विद्यार्थ्यांवर आवश्यक ते उपचार होण्याबाबत चर्चा केली आहेत. कराडचे तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. विद्यार्थ्यांवर हाॅस्पिटलमध्ये योग्य ते उपचार सुरू आहेत.