नाशिक कुंभमेळ्यासाठी ४००० कोटींच्या निविदा; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती, आणखी २००० कोटींचे टेंडर काढणार, अमृतस्नानाच्या तारखाही जाहीर

नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १३ आखाड्यांचे प्रमुख साधू आणि कॅबिनेटमधील मंत्र्यांसोबत रविवारी बैठक पार पडली.
नाशिक कुंभमेळ्यासाठी ४००० कोटींच्या निविदा; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती, आणखी २००० कोटींचे टेंडर काढणार, अमृतस्नानाच्या तारखाही जाहीर
Published on

नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १३ आखाड्यांचे प्रमुख साधू आणि कॅबिनेटमधील मंत्र्यांसोबत रविवारी बैठक पार पडली. या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्नान, शाही स्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. “कुंभमेळ्याच्या निमित्ताने जवळपास ४ हजार कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या कामांच्या निविदा याआधीच आपण काढल्या आहेत, त्या अंतिम टप्प्यावर आहेत. आणखी जवळपास दोन हजार कोटींच्या निविदा आपण काढणार आहोत,” असे बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, “सर्व साधू, महंतांसोबत आणि पुरोहित संघासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये पुढची कार्यवाही कशी करायची, यावर चर्चा झाली. सर्व साधू, महंतांचे म्हणणे आम्ही ऐकून घेतले. आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती त्यांना देण्यात आली. जवळपास ६ हजार कोटींच्या निविदा कुंभमेळ्यासाठी आपण काढणार आहोत. प्रामुख्याने गोदावरी स्वच्छ करण्यासाठी गिरीश महाजन यांनी एक योजना तयार केली आहे, तीदेखील मान्य केली जाणार असून नाशिकमध्ये अनेक विकासकामे केली जाणार आहेत.”

“साधू-संतांनी केलेल्या मागण्यांची नोंद आपण घेतली असून त्यावर आमचे एकमत झाले आहे. विशेषतः त्र्यंबकेश्वरला कुशावर्तावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यावर एकमत झाले आहे. कुंभमेळ्यादरम्यान चेंगराचेंगरी होऊ नये, याची पूर्ण व्यवस्था केली जाणार आहे. साधूग्रामची जागा ही मागच्या काळातच आपण आरक्षित केली होती, आता ती अधिग्रहित करायची आहे आणि त्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे.,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अमृतस्नानाच्या तारखा जाहीर

साधुग्राममध्ये २४ जुलै २०२७ रोजी आखाडा ध्वजारोहण होईल. त्यानंतर कुंभमेळा पर्व सुरू होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या संभाव्य तारखासुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, २ ऑगस्ट २०२७ रोजी पहिले शाही स्नान होणार आहे. २९ जुलै २०२७ रोजी नगर प्रदक्षिणा होईल, तर पहिले अमृतस्नान हे सोमवार २ ऑगस्ट २०२७ रोजी होणार आहे. तर या महाकुंभातील दुसरे अमृतस्नान ३१ ऑगस्ट २०२७ रोजी होणार आहे, तर तिसरे आणि शेवटचे अमृतस्नान हे ११ सप्टेंबर २०२७ रोजी नाशिक येथे होईल. २४ जुलै २०२८ रोजी सिंहस्थ मेळ्याचा ध्वज हा खाली उतरवण्यात येईल. या दिवशीपर्यंत कुंभमेळा सुरू राहील.

logo
marathi.freepressjournal.in