

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त जिल्ह्यात विविध विकास कामे सुरू आहेत. ही सर्व कामे पुढील वर्षी मार्चपूर्वी पूर्णत्वास येतील, असा विश्वास जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदन समारंभ शुक्रवारी सकाळी पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, महापौर हिमगौरी आडके-आहेर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. विविध दलाच्या पथकांनी संचलनात सहभाग घेतला.
उन्नत नाशिक अभियान
महाजन म्हणाले, गोदावरी नदी बारमाही प्रवाही राहावी आणि निर्मळ आणि अविरत पाणी भाविकांना उपलब्ध व्हावे म्हणून विविध योजनांचा समावेश केला आहे. त्यामुळे पुढील वर्षी मार्च पूर्वी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेली विविध विकासकामे पूर्णत्वास येतील.
कुंभमेळ्यासाठी शहर व परिसरात विविध विकासकामे होत असताना शहरासह जिल्हाभरात नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे. मात्र, नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या येणाऱ्या पुढील २५/३० वर्षाच्या नियोजनासाठी ही कामे तितकीच महत्त्वाची आहेत. ही सर्व कामे होत असताना ‘स्वच्छ, सुंदर व हरित नाशिक करण्यासाठी व देशात मॉडेल शहर म्हणून निर्माण करण्यासाठी ‘उन्नत नाशिक अभियान’ राबविण्यात येत आहे.
धनादेश प्रदान, गुणवंतांचा गौरव
यावेळी लान्स नायक संतोष वसंत खिरकाडे यांच्या शौर्यपूर्ण कामगिरी बद्दल पाच लाख रुपयांचा धनादेश, हतगड, ता. सुरगाणाचे ग्राम महसूल अधिकारी स्वप्नील छगन पालवी यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मंजुषा डहाळे, विद्या चिपळणूकर, शोभा पवार यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, प्रदान करण्यात आला.