नाशिक : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी केंद्र व राज्य सरकार दोन्ही कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. सध्या सुमारे ६ हजार कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ झाला असून कुंभमेळा सुरू होईपर्यंत एकूण २५ हजार कोटी रुपयांची कामे पूर्णत्वास जातील, अशी घोषणा त्यांनी केली. नाशिक येथे कुंभमेळा कामांच्या शुभारंभ सोहळ्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.
या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, मंत्री माणिकराव कोकाटे, दादाजी भुसे, खासदार राजाभाऊ वाजे, डॉ. शोभा बच्छाव, आमदार राहुल आहेर, राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, दिलीप बनकर, किशोर दराडे, तसेच प्रमुख अधिकारी आणि महायुती पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिकमध्ये २० हजार कोटींची कामे हाती घेतली असून ती २५ हजार कोटींपर्यंत वाढतील. आधीच ६ हजार कोटींची कामे सुरू झाली आहेत. सर्व प्रशासकीय अधिकारी समन्वयाने काम करत आहेत. काही नागरिकांना विस्थापित व्हावे लागते, तरीही त्यांनी सहकार्य दाखवले आहे.
गोदावरी स्वच्छ ठेवणे आणि पुढील २५ वर्षांचा विकास लक्षात घेऊन नियोजन करणे, हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने सुरक्षेची मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून निगराणी ठेवली जाणार आहे. दर्जेदार सुविधा निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. उत्तम नियोजन आणि अंमलबजावणीद्वारे हा कुंभ यशस्वीपणे पार पडेल, अशी आशा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
७५ वर्षांनंतरचा विशेष कुंभ
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यंदाचा कुंभमेळा ७५ वर्षांनंतर येणाऱ्या त्रिखंड योगात होत असल्याने अत्यंत विशेष आहे. सुमारे २८ महिने चालणारा हा कुंभ असेल. प्रयागराजनंतर जगातील सर्वात मोठा आस्थेचा सोहळा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे भरतो आहे. मागील कुंभ यशस्वी झाला होता; मात्र यावेळी पाच पट अधिक भाविक येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेची आणि सुविधांची व्यवस्था ही मोठी जबाबदारी आहे.
नाशिक जगाच्या नकाशावर झळकेल
सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलेल. हा सोहळा नाशिकला जगाच्या नकाशावर स्थान मिळवून देईल. प्रशासनाने तयारी चोख केली असून हा कुंभ आधुनिक, नियोजनबद्ध आणि सुरक्षित राहील असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.