नाशिकमधून भुजबळांनाच संधी? महायुतीत रस्सीखेच, राष्ट्रवादीलाच सुटू शकते जागा

नाशिकची जागा कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटालाच मिळाली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत. त्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. परंतु भाजप कोणत्याही परिस्थितीत तडजोडीस तयार नाही. मुळात भाजपनेच या जागेवर दावा केला असून, आधीपासूनच दिनकर पाटील तयारीला लागले आहेत.
नाशिकमधून भुजबळांनाच संधी? महायुतीत रस्सीखेच, राष्ट्रवादीलाच सुटू शकते जागा

विशेष प्रतिनिधी / मुंबई

नाशिक लोकसभा मतदारसंघ महायुतीसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा ठरला आहे. कारण एकीकडे शिवसेना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार मैदानात उतरविला. परंतु महायुतीत ही जागा कोणाला सोडायची, यावरून वाद सुरू आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्यासाठी शिवसेना आग्रही आहे. परंतु गोडसे यांना भाजपचा विरोध आहे. येथे भाजप आणि राष्ट्रवादीचीही ताकद मोठी आहे. या जागेसाठी भाजपचे दिनकर पाटील आग्रही आहेत. मात्र, ही जागा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता असून, मंत्री छगन भुजबळ मैदानात उतरू शकतात. दरम्यान, मराठा महासंघाचा त्यांच्या उमेदवारीला विरोध आहे. यातून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

नाशिकची जागा कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटालाच मिळाली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत. त्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. परंतु भाजप कोणत्याही परिस्थितीत तडजोडीस तयार नाही. मुळात भाजपनेच या जागेवर दावा केला असून, आधीपासूनच दिनकर पाटील तयारीला लागले आहेत. मात्र, शिवसेना व भाजप वादात राष्ट्रवादीला ही जागा सोडण्याचा मार्ग काढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या भुजबळ यांच्या नावाची घोषणा करू शकतात. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ही जागा सोडायला सक्त विरोध आहे. त्यामुळे घोषणा लांबणीवर पडत चालली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत रविवारी यासंबंधीची घोषणा होऊ शकते, असे बोलले जात आहे. त्यामुळे छगन भुजबळ हेच नाशिकमधून मैदानात उतरण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. आता फक्त घोषणा बाकी असून, उद्या ती होऊ शकते. मात्र, भुजबळ यांच्या उमेदवारीला सकल मराठा समाजाने कडाडून विरोध केल्याने भुजबळांना उमेदवारी दिल्यास संघर्ष अटळ असल्याचे बोलले जात आहे. मात्र, यातून मतविभाजनाचाही धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेची माघार नाहीच

शिवसेनेने नाशिकच्या जागेसाठी प्रचंड आग्रह धरला आहे. कारण बऱ्याच जागांवरून शिंदे गटाच्या शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना माघार घ्यावी लागलेली आहे. त्यामुळे आधीच शिंदे गटात अस्वस्थता आहे. त्यात नाशिकमध्येही विद्यमान खासदार असताना आम्ही माघार घेणार नाही, अशीच शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे यावरून टोकाचे मतभेद समोर आले आहेत. त्यात राष्ट्रवादीला ही जागा सोडल्यास मोठा विरोध होण्याची शक्यता आहे.

...तर ४८ जागांवर परिणाम

नाशिकमधून मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देऊन कुणीही पायावर धोंंडा मारून घेऊ नये. भाजपचे नेते म्हणतात की, आम्ही सर्व्हेच्या आधारे उमेदवार देत असतो. पण भुजबळांचे नाव आल्यानंतर कुणीही त्यांना उमेदवारी द्या, असे म्हणणार नाही. त्यातूनच भुजबळांना उमेदवारी दिल्यास याचा राज्यातील सर्वच्या सर्व ४८ मतदारसंघांत परिणाम दिसून येऊ शकतो, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in