नाशिकचा गुंता सुटेना, शिंदे सेनेचा उमेदवार ठरेना; आता भाजपही आग्रही

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे दावे-प्रतिदावे सुरूच आहेत. या मतदारसंघाचा तिढा सुटत नसल्याने प्रतीक्षा करून अखेर मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन नाशिकच्या जागेवरचा दावा सोडला. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाचा मार्ग मोकळा झाला असे बोलले जात होते. मात्र...
नाशिकचा गुंता सुटेना, शिंदे सेनेचा उमेदवार ठरेना; आता भाजपही आग्रही
संग्रहित छायाचित्र, पीटीआय

मुंबई : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे दावे-प्रतिदावे सुरूच आहेत. या मतदारसंघाचा तिढा सुटत नसल्याने प्रतीक्षा करून अखेर मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन नाशिकच्या जागेवरचा दावा सोडला. यावेळी त्यांनी थेट भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदेश देऊनही मला उमेदवारी दिली गेली नाही, अशी खंत व्यक्त केली. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाचा मार्ग मोकळा झाला असे बोलले जात होते. मात्र, शिवसेनेत उमेदवारी कोणाला द्यायची, यासंबंधी खल सुरू असतानाच भाजपने पुन्हा या जागेवर दावा केला असून, आम्हालाच ही जागा सोडावी, असे म्हटले आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेचा गुंता काही सुटता सुटेना, अशी महायुतीची अवस्था झाली आहे.

महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने तीन आठवड्यांपूर्वीच आपला उमेदवार जाहीर केला असून, सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना मैदानात उतरविले. त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. परंतु, अजूनही महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. एक तर अजूनही नाशिकची जागा नेमके कोण लढविणार, याचाच अंदाज नाही. कारण जागेसाठी एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावा करीत आहेत आणि त्यादृष्टीने उमेदवाराची चाचपणी करीत आहेत, तर दुसरीकडे भाजनेही दावा सोडलेला नाही.

खरे तर या जागेवर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांनी दावा सांगितला होता आणि भाजप पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या नावाला ग्रीन सिग्नलही मिळाल्याचे सांगण्यात येत होते. परंतु हा तिढा सुटत नाही, याचा अंदाज येताच खुद्द भुजबळ यांनी या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाशिकचा तिढा सुटेल, असे वाटत होते. परंतु, छगन भुजबळ या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर आता पुन्हा भाजपने या जागेसाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेचा गुंता वाढतच चालला आहे.

शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे नाशिकचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे ही जागा शिंदे गटालाच मिळाली पाहिजे, असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आग्रह आहे. त्यासाठी त्यांनी गोडसे यांना तयारी करण्यास सांगितले. परंतु, नाशिकचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बोरस्ते यांनीही उमेदवारीबाबत आग्रह धरला आहे. त्यामुळे शिवसेनेत कोणाला उमेदवारी द्यायची, याचा खल सुरू असतानाच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या जागेसाठी पुन्हा जोर लावल्याने शिंदे गट अडचणीत आला आहे.

नाशिकमध्ये भाजपचे वर्चस्व

खरे तर या मतदारसंघात भाजपची ताकद मोठी आहे. कारण या मतदारसंघात भाजपचे जवळपास ३ आमदार आहेत. तसेच स्थानिक पातळीवरदेखील भाजपचेच वर्चस्व आहे. त्यामुळे नाशिकची जागा भाजपला सुटावी, अशी आग्रही मागणी पुन्हा भाजपने केली आहे. यावरून जागावाटपाचा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. आता काही दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. त्या अगोदर हा तिढा सोडविणे आवश्यक आहे. परंतु महायुतीतील हा वाद लवकर सुटण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in