

नाशिक : तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडली आहे. याप्रकरणी एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
प्राप्त माहितीनुसार, डोंगराळे गावात राहणाऱ्या विजय संजय खैरनार ( २४ वर्षे ) याने चिमुरडीवर अत्याचार केला आणि त्यानंतर दगडाने तिचे डोके ठेचून अमानुषपणे हत्या केली. चिमुरडी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांसह गावातील लोकांनी तीचा शोध सुरु केला. अशातच ती एका ठिकाणी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. स्थानिक डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता ती मृत झाल्याचे सांगण्यात आले.
वडिलांसोबतच्या भांडणाचा बदला?
तीन वर्षीय चिमुरडीच्या वडिलांसोबत आरोपीचे काही महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा बदला तरुणाने अशा पद्धतीने घेतला, अशी गावात चर्चा आहे. पोलिसांनी घटनेनंतर अर्ध्या तासात विजय खैरनारला अटक केली. या घटनेनंतर गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी सकाळी मयत चिमुकलीच्या नातेवाईकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. नराधमाला आमच्या ताब्यात द्या, भरचौकात फाशी द्या अशा संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. निषेधार्थ गावात कडकडीत बंदही पाळण्यात आला.
अखेर मंत्री दादा भुसे आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ही केस फास्टट्रॅक कोर्टान नेऊ आणि सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करू असे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी रास्तारोको मागे घेतला. भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून राज्य सरकार सर्वोत्तपरी मदत करणार आहे. पीडित कुटुंबाला चांगल्यात चांगला वकील देऊन फास्ट ट्रॅकवर केस चालवली जाईल. आरोपीला शिक्षा मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. समाजात विकृत वावरणारे लांडगे ठेचायची आता वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.