Nashik : बारा तासांत २ तरुणांची हत्या

अवघ्या बारा तासांच्या आत शहरात दोन तरुणांची हत्या झाल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. सातपूर आणि पाथर्डीगाव या दोन ठिकाणी घडलेल्या या घटनांमुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Nashik : बारा तासांत २ तरुणांची हत्या
Published on

नाशिक : अवघ्या बारा तासांच्या आत शहरात दोन तरुणांची हत्या झाल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. सातपूर आणि पाथर्डीगाव या दोन ठिकाणी घडलेल्या या घटनांमुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरवासीयांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, खुनाचे सत्र थांबवण्याची मागणी जोर धरत आहे.

सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रमिकनगर येथे गुरुवारी रात्री उशिरा हत्येची पहिली घटना घडली.

जगदीश उर्फ भय्या वानखेडे (रा. श्रमिकनगर) हा तरुण गरबा खेळून मित्रासोबत दुचाकीवरून घरी परत येत असताना स्वामी समर्थ चौकात त्याला काही तरुणांच्या टोळक्याने अडवले. ‘गाडी नीट चालवता येत नाही का?’ असे विचारून त्यांनी वाद घातला आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करून जगदीशचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील काही आरोपींवर यापूर्वीही खुनाचा गुन्हा दाखल आहे.

गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पाथर्डीगावातील एका कॅफेमध्ये रशीद हारूण खान या तरुणाची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली. इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरवस्तीतील या कॅफेमध्ये रशीदवर हल्ला करण्यात आला.

हत्येनंतर त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला, जिथे त्याच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. या दोन्ही घटनांमुळे नाशिक शहरात तणावाचे वातावरण असून, कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिक या गंभीर गुन्हेगारीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in