लासलगाव : रब्बी हंगामातील कांद्याला उत्पादन खर्चाइतकाही भाव मिळत नसल्याने कांदेभावाचा नेहमीप्रमाणेच वांदा झाला आहे. देशातील सर्व बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव दणक्यात कोसळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आणि विविध शेतकरी संघटनांनी दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात शनिवारी सकाळच्या सत्रात कांद्याच्या लिलावात पुकारलेला भाव मागे घेत कमी भाव दिला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी थेट नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर उतरून काही काळ रस्ता रोको आंदोलन छेडले. लासलगाव पोलीसांच्या मध्यस्थीनंतर लिलाव पूर्ववत सुरू झाले.
कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असून मागणीपेक्षा पुरवठा अधिक असल्याने तसेच केंद्र सरकारने खरेदी केलेला कांदा आता बाजारात विक्रीसाठी काढल्याने बाजारभाव कोसळत आहे. त्यातच शेतकऱ्यांनाही साठवणूक केलेला कांदा विक्रीला आणला आहे, मात्र त्याची प्रतवारी खालावल्यामुळे कांद्याला दिलेली 'बिट रिव्हर्स' करण्यात आल्याची माहिती व्यापाऱ्याने दिली.
विंचूर उपबाजार आवारात शनिवारी सकाळच्या सत्रात सुमारे ३२५ वाहनातून कांदा विक्रीसाठी आला होता. गाजरवाडी येथील अण्णाजी हरीभाऊ आरोटे या शेतकऱ्याच्या गोल्टी खाद कांद्याला २०० रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर करण्यात आला. नंतर पुकारलेला भाव मागे घेत १०० रुपयांवर आणण्यात आला. त्यानंतर १५० रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केल्याने शेतकऱ्यांचा संताप उसळला. व्यापाऱ्यांच्या या कृतीमुळे संतप्त शेतकऱ्यांनी नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर अचानक रस्ता रोको सुरू केला. परिस्थितीची माहिती मिळताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांची समजूत काढत वाहतूक सुरळीत केली. शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारात आणून पुनर्लिलाव करण्यात आला. व्यापाऱ्यांच्या कृतीबद्दल बाजार समितीचे संचालक छबुराव जाधव यांनी असे प्रकार घडल्यास संबंधित व्यापाऱ्याचे तत्काळ लायसन्स रद्द करण्यात येईल, असा इशारा व्यापाऱ्यांना दिला.
चांदवड प्रांत कार्यालयात कांदा ओतून ठिय्या !
उमराणा बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या कांद्याला केवळ १ हजार रुपये क्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी कांदा ट्रॅक्टर घेऊन थेट चांदवड प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून प्रवेशद्वारासमोरच कांदा भरलेला ट्रॅक्टर उभा करून घोषणाबाजी केली. प्रांताधिकारी यांच्या दालनात कांदे ओतून शेतकऱ्यांनी दोन तास ठिय्या आंदोलन केले. प्रहारचे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर यांनी केंद्र व राज्य शासनापर्यंत शेतकऱ्यांच्या व्यथा पोहचविण्याची मागणी केली. प्रांताधिकारी कडलग यांच्यामार्फत विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याशी बोलणे झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नामपुरला दोन तास रस्ता रोको
नामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर कांद्याच्या भावातील मोठ्या घसरणीमळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रयत क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रहार संघटनेचे दीपक पगारे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी कांद्याच्या बाजार भावात सातत्याने होत असलेली घसरण व नाफेड संस्थेच्या आणि शासनाचे निर्यात धोरणाविरोधात संताप व्यक्त केला.
सात दिवसांचे फोन आंदोलन !
कांदा उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने शुक्रवारपासून सात दिवस राज्यव्यापी फोन आंदोलन सुरू केले आहे. कांदा उत्पादक शेतकरी थेट आमदार, खासदार, राज्यातील मंत्री, केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना फोन करून जाब विचारणार आहेत.
