
नाशिक : गुंतवणुकीतून अल्पावधीतील दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड शहरात करण्यात आला आहे. ‘ओपन हॅन्ड्स’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना एक कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले. हे रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील तिघांना जेरबंद करण्यात आले आहे. तथापि मुख्य सूत्रधारांसह दोघे जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, विकी शिंदे (रा. मालेगाव), संदीप मत्साळकर (रा. इंदिरानगर, नाशिक), विष्णु मुरलीधर पाटील (रा. मालेगाव), प्रमोद बाबुलाल बिल्लाडे ( रा. इंदिरानगर, नाशिक) आणि चेतन संजय महाजन (रा. देवळा) या पाच जणांनी संगनमत करून ‘ओपन हॅन्ड्स’ या संकेतस्थळ सुरु केले. या संकेतस्थळ प्रचारासाठी ते झूम मीटिंग अथवा विशिष्ट शहरांमध्ये प्रत्यक्ष बैठका घेण्याचेही त्यांचे धोरण होते. गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना केवळ बारा ते चौदा दिवसांत गुंतवलेली रक्कम दुप्पट करण्याचे आमिष बैठकांत दाखवले जात होते.
यासंदर्भात तक्रारी प्राप्त होताच नाशिक सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. गेल्या २ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास छापा टाकत आरोपी विष्णु पाटील, प्रमोद बिल्लाडे आणि चेतन महाजन या तिघांना अटक केली. मुख्य सूत्रधार मानले जाणारे विकी शिंदे आणि संदीप मत्साळकर हे मात्र फरार होण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
एक कोटी रुपयांचा घातला गंडा
योजनेतील सहभागासाठी गुंतवणूकदारांसाठी एक हजार रुपये किमतीची एक ‘पिन’ विकत घ्यावी लागे. या टोळीने तब्बल दहा हजार नागरिकांना ‘पिन’ विकून आणि सुमारे अडीच हजार व्यवहारांमधून अंदाजे एक कोटीची रक्कम जमवली. ही सर्व रक्कम त्यांनी नागरिकांना कोणताही परतावा न देता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.