नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर; लोंढे पिता-पुत्रासह अजय बागुलवर गुन्हा दाखल, राजकीय पाठबळ लाभलेल्यांकडे वक्रदृष्टी

गेले काही महिने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची चौफेर टीका झाल्यानंतर नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर आले असून कोणाचाही मुलाहिजा न बाळगता गुन्हेगारी मोडीत काढण्याचा चंग बांधल्याचे स्पष्ट झाले आहे. याच अनुषंगाने वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभाग असलेल्या सातपूरच्या लोंढे पिता-पुत्रांसह भाजप नेते सुनील बागुल यांचे पुतणे अजय याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर; लोंढे पिता-पुत्रासह अजय बागुलवर गुन्हा दाखल, राजकीय पाठबळ लाभलेल्यांकडे वक्रदृष्टी
रिपाइ ( आठवले गट ) चे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक ऊर्फ नानाजी लोंढे
Published on

नाशिक : गेले काही महिने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची चौफेर टीका झाल्यानंतर नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर आले असून कोणाचाही मुलाहिजा न बाळगता गुन्हेगारी मोडीत काढण्याचा चंग बांधल्याचे स्पष्ट झाले आहे. याच अनुषंगाने वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभाग असलेल्या सातपूरच्या लोंढे पिता-पुत्रांसह भाजप नेते सुनील बागुल यांचे पुतणे अजय याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गोळीबार प्रकरणात रिपाइ ( आठवले गट ) चे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक ऊर्फ नानाजी लोंढे यांना पोलिसांनी सहआरोपी केले असून, त्यांना बुधवारी रात्री ताब्यात घेण्यात आले आहे. एका बिअर बारसमोर विजय तिवारी या वीस वर्षीय तरुणावर भूषण लोंढे यासह काही जणांनी पूर्वनियोजित कट रचून गोळीबार केला. या गोळीबारात तिवारीच्या मांडीत गोळी लागली. या गोळीबार प्रकरणातील उर्वरित संशयितांच्या पोलीस मागावर आहेत. या प्रकरणात याआधीच भूषण लोंढे याच्यासह बारा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रकाश लोंढेसह त्याचा मुलगा दीपक लोंढे याच्यासह संतोष पवार आणि अमोल पगारे अशा चौघांचा सहभाग आढळल्याने सातपूर पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेत सहआरोपी केले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली. 

अजय बागुलवर गुन्हा दाखल

दरम्यान, दुसऱ्या एका घडामोडीत पोलिसांनी भाजप नेते सुनील बागुल यांचे पुतणे अजय याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी सचिन साळुंखे याच्यावर गोळीबार झाल्याप्रकरणी अजय बागूलसह सात जणांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय बागूलसह अन्य तीन ते चार संशयित आरोपी फरार झाले असून चार पोलिस पथके त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपासात अजय बागूलसह बॉबी गोवर्धने, विकी ऊर्फ वैभव आणि इतर चार जणांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

९ महिने .. ४५ खून

एरव्ही शांततेसाठी लौकिक असलेल्या नाशिक शहराचा अलीकडील काळात गुन्हेविश्वाने डोके वर काढल्याने दुर्लौकिक झाला आहे. गेल्या ९ महिन्याच्या काळात तब्बल ४५ खुनांनी इथला लौकिक काळवंडला. विविध राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संघटना यांच्याकडून चिंता व्यक्त करताना गुन्हेगारी मोडीत काढण्याची मागणी करण्यात येत आहे, नाशिकमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर अनेकांनी बोट ठेवल्यानंतर हा विषय थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचला. बहुधा, पोलिसांची धडाकेबाज कृती त्याचाच परिणाम असल्याचे बोलले जात आहे. लोंढे-बागुल यांच्यानंतर राजकीय पार्श्वभूमी असलेले आणि गुन्हेविश्वाशी संबंधित आणखी कोण नेते पोलिसांच्या रडारवर येतात, याकडे नाशिककरांचे लक्ष लागून राहणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in