

नाशिक : नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी क्रांती दिनाचे औचित्य साधत रविवारी सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. आमदार सत्यजीत तांबे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आंदोलकांनी समृद्धी महामार्गावर ठिय्या देत चक्काजाम आंदोलन केले.
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी सरळ मार्गाला प्राधान्य देऊन प्रकल्पाबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी नाशिक-पुणे रेल्वेच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हा रेल्वे प्रकल्प केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना महामार्गावरून बाजूला होण्याचे आवाहन केले. मात्र, नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गाबाबत शासनाने ठोस निर्णय घेईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ झटापट झाल्याची माहिती आहे.
नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गामुळे नाशिक, सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, आळंदी आणि पुणे या भागांना थेट जोडणी मिळण्यास मदत होणार आहे. नाशिक-पुणे सरळ रेल्वे प्रकल्पासाठी विविध स्तरांवर पाठपुरावा सुरू असतानाच समृद्धी महामार्गावर करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा आक्रमकपणे ऐरणीवर आला आहे. शासनाने जनभावना लक्षात घेऊन तातडीने सकारात्मक आणि ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आमचा लढा सुरूच राहणार
आमदार सत्यजीत तांबे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गाचा प्रश्न शासनाच्या केंद्रस्थानी आणण्याचा निर्धार व्यक्त केला. हा कोणत्याही एका पक्षाचा विषय नाही, तर जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाबाबत आता केवळ चर्चा नको, तर ठोस निर्णय हवा. हक्काची रेल्वे मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.