

नाशिक : नाशिक-पुणे थेट रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट (क्रांती दिन) रोजी सकाळी ९ वाजता नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. सिन्नर तालुक्यातील गोंदेफाटा येथे समृद्धी महामार्ग आणि नाशिक-पुणे महामार्गावर एकाच वेळी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीने देण्यात आली.
नाशिक-शिर्डी-पुणतांबा-अहिल्यानगर-पुणे हा प्रस्तावित वळणाचा रेल्वे मार्ग अव्यवहार्य असून, त्यामुळे सुमारे ७० किलोमीटरचे अतिरिक्त अंतर वाढणार असल्याचा दावा समितीने केला आहे. त्यामुळे नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गाची मागणी गेल्या ४० वर्षांपासून करण्यात येत आहे.
समितीच्या म्हणण्यानुसार, नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी सिन्नरसह अनेक भागांतील भूसंपादन, सर्वेक्षण आणि आराखड्याच्या प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या असून त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. मात्र, हा प्रकल्प बाजूला ठेवून वळणाचा मार्ग उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यामुळे यापूर्वी झालेला खर्च वाया जाण्याबरोबरच नवीन मार्गासाठी वेळ आणि अतिरिक्त निधी खर्च होणार असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
वळणाचा मार्ग नको, सरळ मार्गाची मागणी
नाशिक-पुणे वळणाच्या रेल्वे मार्गामुळे अंतर, प्रवासाचा वेळ आणि खर्च वाढणार असल्याने शेतकरी, व्यापारी, उद्योजक, नोकरदार आणि विद्यार्थ्यांसाठी हा मार्ग गैरसोयीचा ठरणार असल्याचे समितीने म्हटले आहे. तसेच पुणे-नाशिक औद्योगिक कॉरिडॉरच्या विकासासाठीही हा मार्ग पूरक नसल्याचा दावा करण्यात आला आहे.त्यामुळे नाशिक-सिन्नर-संगमनेर-अकोले-नारायणगाव-आळेफाटा-मंचर-खेड-चाकण-पुणे हा पूर्वीचा सरळ रेल्वे मार्ग कायम ठेवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.