नाशिकवर वरुणराजा मेहरबान! ११ धरणे काठोकाठ; १५ धरणांतील जलसाठा ८३ टक्क्यांवर, जायकवाडीलाही झाला लाभ

एरव्ही पावसाची वाट बघत कडक उन्हाने शुष्क पडलेल्या धरणांमधील जलसाठ्याची प्रतीक्षा करणाऱ्या नाशिक जिल्हावासीयांवर यंदा वरुणराजा चांगलाच मेहरबान झाला आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नाशिक : एरव्ही पावसाची वाट बघत कडक उन्हाने शुष्क पडलेल्या धरणांमधील जलसाठ्याची प्रतीक्षा करणाऱ्या नाशिक जिल्हावासीयांवर यंदा वरुणराजा चांगलाच मेहरबान झाला आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील ११ धरणे काठोकाठ भरली असून उर्वरित १५ धरणांतील जलसाठा ८३ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिकच्या पावसाचा लाभ होणाऱ्या मराठवाड्यातील जायकवाडी ( नाथसागर ) धरण क्षेत्रातील साठादेखील ९० टक्क्यांवर गेल्याचे आकडेवारी सांगते.

गेल्या मे महिन्यापासून राज्यात वरुणराजा सातत्याने जोरदार हजेरी लावत आहे, नाशिकदेखील त्याला अपवाद नाही. जिल्ह्यातील सर्व धरणांतील जलसाठा समाधानकारक असल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. नाशिक जिल्ह्यात प्रमुख २६ धरणे अस्तित्वात आहेत. यांमधील एकूण जलसाठा ५८.३८० दशलक्ष घनफुटांवर ( टीएमसी ) पोहचला आहे, जो गतवर्षीच्या तुलनेत १५.६०० टीएमसी प्रमाणात अधिक आहे. यापैकी अकरा धरणे 'ओव्हरफ्लो' झाली असून इतर पंधरा धरणांतील साठ्याचे प्रमाण बघता त्या-त्या परिसरांतील पाण्याची चिंता पुढील वर्षापर्यंत मिटली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामधील जलसाठा ८३ टक्क्यांवर ( ४,६५१ टीएमसी ) असल्याचे आकडेवारी सांगते.

बळीराजासोबत जनताही सुखावली ...

गेल्या अडीच महिन्याचा आलेख पाहता पावसाचे सार्वत्रिक प्रमाण लक्षणीय राहिले आहे. विशेषतः, यंदा जूनऐवजी मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. पावसाचे प्रमाण सातत्यपूर्ण राहण्यासोबत जोरदार राहिल्याने बळीराजासोबत अन्य जनताही सुखावली आहे. यंदा हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज तंतोतंत वास्तवात आला आहे. अजून किमान एक महिना पाऊस पाडण्यात सातत्य राहण्याची शक्यता असल्याने नाशिक जिल्ह्यातील उर्वरित धरणांतील जलसाठा परिपूर्ण होण्याची शक्यता आहे.

काठोकाठ धरलेली धरणे...

कश्यपी, आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, नांदूर मध्यमेश्वर, तिसगाव, भाम, हरणबारी, केळझर आणि माणिकपुंज

मराठवाडा जल संकटमुक्त ..

नाशिकच्या गंगापूरसह काही धरणांतून नांदूर मध्यमेश्वरमार्गे जायकवाडी धरणात पाणी पोहचते. यंदाचा जलाभ्युदय पाहता जायकवाडीचा साठा ९० टक्क्यांपर्यंत पोहचल्याने मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटली आहे.

logo
marathi.freepressjournal.in