नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी; 'या' जिल्ह्यांना थेट फायदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारविषयक कॅबिनेट समितीने बुधवारी देशातील पायाभूत सुविधांना गती देणाऱ्या दोन प्रमुख महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी; 'या' जिल्ह्यांना थेट फायदा
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी; 'या' जिल्ह्यांना थेट फायदा
Published on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारविषयक कॅबिनेट समितीने बुधवारी देशातील पायाभूत सुविधांना गती देणाऱ्या दोन प्रमुख महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांची एकूण अंदाजित किंमत २० हजार ६६८ कोटी रुपये आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक-सोलापूर-अक्कलकोट (३७४ किमी) हा सहा पदरी ग्रीनफिल्ड कॉरिडॉर आणि ओदिशातील एनएच-३२६ (२०६ किमी) रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरणाचा समावेश आहे.

कॅबिनेटने महाराष्ट्रात ‘बीओटी’ (टोल) मोडवर ३७४ किमी लांबीच्या नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडॉरच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत १९ हजार १४२ कोटी रुपये आहे. हा कॉरिडोर नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडत कुरनूलपर्यंत संपर्कता मजबूत करेल. हा उपक्रम पीएम गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनअंतर्गत एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधा विकासाला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा आहे.

'या' जिल्ह्यांना थेट फायदा

हा महामार्ग महाराष्ट्रातील महत्त्वाच्या चार जिल्ह्यांमधून जाणार आहे. यामध्ये नाशिक, अहिल्यानगर (अहमदनगर), धाराशिव आणि सोलापूरचा समावेश आहे. या महामार्गामुळे राज्याच्या दळणवळणाला नवी गती मिळेल. विशेषतः शेतमाल आणि औद्योगिक उत्पादनांच्या वाहतुकीसाठी हा मार्ग 'गेम चेंजर' ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नाशिक ते अक्कलकोट दरम्यानचा हा ग्रीनफिल्ड मार्ग वाढवण बंदर इंटरचेंजजवळ दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेला, नाशिकमध्ये राष्ट्रीय महामार्ग -६० (आडेगाव) च्या जंक्शनवर आग्रा-मुंबई कॉरिडॉरला आणि पांगरी (नाशिक जवळ) येथे समृद्धी महामार्गाला जोडण्याचे प्रस्तावित आहे. हा प्रस्तावित मार्ग पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व किनारपट्टीपर्यंत थेट दळणवळण उपलब्ध करेल. चेन्नई बंदराच्या बाजूने, तिरुवल्लूर, रेणिगुंटा, कडप्पा आणि कुर्नूलमार्गे चेन्नई ते हसापूरपर्यंत (महाराष्ट्र सीमा, ७०० कि.मी. लांब) चार पदरी मार्गिकेचे काम प्रगतीपथावर आहे.

‘एनआयसीडीसी’ने महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे हाती घेतल्या जाणाऱ्या प्रस्तावित नवीन एक्स्प्रेस वेचा भाग म्हणून हा प्रकल्प असेल. या प्रकल्पामुळे सुधारित सुरक्षा आणि विनाव्यत्यय वाहतुकीसाठी द्रुतगती मार्ग उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ, वाहतूक कोंडी आणि परिचालन खर्च कमी व्हायला मदत होईल. महत्त्वाचे म्हणजे, हा प्रकल्प या क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याबरोबरच नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सर्वांगीण आर्थिक विकासात मोलाचे योगदान देईल.

हा सहापदरी ॲक्सेस-कंट्रोल्ड ग्रीनफिल्ड कॉरिडॉर 'क्लोज टोलिंग' सुविधेसह असणार आहे. या मार्गावर सरासरी ताशी ६० कि.मी. आणि ताशी १०० कि.मी. डिझाइन स्पीडची अनुमती असेल. यामुळे प्रवासाचा एकूण वेळ अंदाजे १७ तासांपर्यंत कमी होईल. तसेच प्रवासी आणि मालवाहू वाहनांसाठी अधिक सुरक्षित, वेगवान आणि विनाव्यत्यय दळणवळणाची सुविधा उपलब्ध होईल. या प्रकल्पामुळे सुमारे २५१.०६ लाख मनुष्य-दिवस प्रत्यक्ष रोजगार आणि ३१३.८३ लाख मनुष्य-दिवसांचा अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल. या प्रस्तावित मार्गिकेच्या आसपासच्या परिसरात आर्थिक घडामोडी वाढल्यामुळे अतिरिक्त रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतील.

३१ तासांचा वेळ आता थेट १७ तासांवर

सध्या नाशिक ते सोलापूर प्रवासासाठी लागणारा ३१ तासांचा वेळ (जड वाहतुकीसह) आता थेट १७ तासांवर येणार आहे. तसेच सध्याचे ४३२ किलोमीटरचे अंतर कमी होऊन ते ३७४ किलोमीटरवर येईल. हा महामार्ग केवळ शहरांनाच नाही, तर ८ रेल्वे स्थानके आणि ६ विमानतळांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in