

मुंबई : नव्याने ताफ्यात दाखल झालेली एक एसटी बस तांत्रिक बिघाडामुळे १५ दिवस कार्यशाळेत पडून राहिल्याने झालेल्या नुकसानीला जबाबदार धरून नाशिक विभागातील प्रादेशिक अभियंता, यांत्रिक अभियंता आणि विभाग नियंत्रकांसह एकूण १२ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
ऐन गर्दीच्या हंगामात ही बस सेवेबाहेर राहिल्याने महामंडळाचे ३ लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी ही कारवाई केली.
महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी (नियंत्रण अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान) केलेल्या अचानक तपासणीत हा गंभीर प्रकार उघडकीस आला. या बसमध्ये केवळ किरकोळ तांत्रिक बिघाड झाला होता. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत सुटे भाग (स्पेअर पार्ट्स) उपलब्ध करून दिले नाहीत किंवा दुरुस्तीच्या कामाकडे लक्ष दिले नाही. प्रवाशांची मोठी मागणी असतानाही ही बस १५ दिवस कार्यशाळेतच पडून होती, ज्यामुळे महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आणि प्रवाशांचीही गैरसोय झाली.
या अधिकाऱ्यांवर झाली कारवाई
प्राप्त माहितीनुसार, निलंबित करण्यात आलेल्यामध्ये वर्ग-१ श्रेणीतील ३ उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये प्रादेशिक अभियंता श्रावण सोनवणे, नाशिकचे विभाग नियंत्रक सचिन क्षिरसागर, यंत्र अभियंता पंकज महाजन, विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, आगार व्यवस्थापक (पंचवटी) सौरभ देवरे, लेखा अधिकारी नीलिमा विसपुते, विभागीय लेखा अधिकारी संजय गायधनी, विभागीय भंडार अधिकारी अमोल वाघ, विभागीय कर्मवर्ग अधिकारी अश्विनी चव्हाण, विभागीय अभियंता चैताली भुसारे आणि आगार व्यवस्थापक प्रणव अहिरे आदींचा समावेश आहे.
अचानक भेटींमधून घोटाळा उघड
१० जून रोजी महामंडळाचे व्यवस्थापक तथा नियंत्रण अधिकारी वीरेंद्र कदम यांनी सांख्यिकी व नियोजन अधिकाऱ्यांसमवेत इगतपुरी आणि नाशिक आगारांना अचानक भेटी दिल्या. या गुप्त तपासणीत अधिकाऱ्यांचा जाणीवपूर्वक केलेला निष्काळजीपणा समोर आला. वाहनांचे बेसिक रेकॉर्ड न ठेवणे, चालकांच्या हजेरीवर नियंत्रण नसणे, नादुरुस्त वाहने वेळेत दुरुस्त न करणे आणि प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून विभागाला जाणीवपूर्वक तोट्यात ढकलण्याचा गंभीर कट या अधिकाऱ्यांनी रचल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.