
लासलगाव : नाशिकजवळील आडगाव येथील एका २० वर्षीय विद्यार्थिनीने, 'आई माझ्या शिक्षणाची काळजी घेऊ नको, अशी भानविक चिठ्ठी लिहित आपली जीवन यात्रा संपविली. सदर मुलीची आई पोलिस ठाण्यात अंमलदार आहे. तिने गळफास घेण्यापूर्वी आईला चिठ्ठी लिहिली आहे. पूजा दीपक डांबरे (२०, रा. विहंग अपार्टमेंट, व्ही. डी. कामगार नगर,अमृतधाम,पंचवटी) असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
नुकतीच बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिने प्रथम वर्षात प्रवेश घेत महाविद्यालयीन शिक्षण सुरु केले होते. पूजाचे वडील विभक्त राहत असून ती आईसोबत राहात होती. 'आई तुला त्रास द्यायचा नाही. माझा शैक्षणिक खर्च फार आहे. तू काळजी करू नकोस. तुझी धावपळ होते, असे मुलीने चिठ्ठीत लिहिले आहे.
कौटुंबिक अडचणी आणि मानसिक तणावामुळे पूजा गेल्या काही दिवसांपासून खचून गेली होती. आई पोलिस खात्यात कार्यरत असल्याने दोघींवर कौटुंबिक आणि घरच्या जबाबदाऱ्यांचा ताण होता. या तणावातूनच पूजाने राहत्या घरातील हॉलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले. हा प्रकार लक्षात येताच तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.