Nashik : "छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करतायेत", शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप

एवढाच तुतारीचा पुळका असेल तर मंत्री भुजबळांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि खुशाल तुतारीचा प्रचार करावा, असेही कांदे म्हणाले.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ 'तुतारी' चिन्हाचा प्रचार करत असल्याचा गंभीर आरोप नाशिकच्या नांदगाव येथील शिवसेना (शिंदे गट) आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत, त्यांचे नेते तुतारीचा प्रचार करत असून त्यांचे फोटो आणि व्हिडीओ माझ्याकडे आहेत, असा खळबळजनक आरोप कांदेंनी केलाय.

दिंडोरी लोकसभेसाठी शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांचा मेळावा कांदे यांच्या निवासस्थानी पार पडला. यावेळी बोलताना, नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष महायुतीचा धर्म न पाळता विरोधकांचा, तुतारी या चिन्हाचा प्रचार करीत आहे. मंत्रीपदं महायुतीकडून घ्यायची, पण काम तुतारीचं करायचं. तुम्हाला एवढाच तुतारीचा पुळका असेल तर मंत्री भुजबळांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि खुशाल तुतारीचा प्रचार करावा, असे कांदे म्हणाले. भाजपाचे नेतेही जर शांतपणे हे पाहत असतील तर हे दुर्दैव आहे, असेही कांदे म्हणाले.

नाशिकमध्ये सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद नवीन नाही. दोघेही एकमेकांचे विरोधक आहेत. पण राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) दोन्ही महायुतीत आल्यानंतर कांदे आणि भुजबळ यांच्यातील वाद मिटल्याचे सांगितले जात होते. तथापि, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोघांमधील वाद पुन्हा उफाळून आल्याचे दिसत आहे.

logo
marathi.freepressjournal.in