

नाशिक : शहरातील बहुचर्चित टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला अखेर छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना सहआरोपी करण्यात आले असून निदाला आश्रय दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
२५ मार्चपासून फरार असलेली निदा खान सतत पोलिसांना चकवा देत होती. टीसीएस लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना मदत करणे तसेच कथित धर्मांतर कारवायांमध्ये सक्रिय भूमिका बजावल्याचा आरोप तिच्यावर आहे.
अटकेनंतर विशेष तपास पथकाने तपास अधिक तीव्र केला असून, या प्रकरणामागे परदेशी निधी आणि आंतरराष्ट्रीय संबंध असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत या प्रकरणात एका महिला ऑपरेशन्स मॅनेजरसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर तिला उशिरा रात्री नाशिक रोड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिच्याकडून दोन स्मार्टफोन जप्त करण्यात आले असून, या मोबाईलमधून तपासासाठी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
काय आहेत आरोप?
न्यायालयीन सुनावणीदरम्यान फिर्यादी पक्ष, एसआयटी आणि पीडितेच्या वकिलांकडून निदा खानवर गंभीर आरोप करण्यात आले. एचआर अधिकारी म्हणून काम करताना तिने पीडितेला बुरखा आणि धार्मिक पुस्तके दिली. तसेच मोबाईलमध्ये इस्लामिक धार्मिक अॅप्स इन्स्टॉल केल्याचा आरोप आहे. हे सर्व कथित धर्मांतर प्रक्रियेचा भाग असल्याचा दावा करण्यात आला आहे.
नाशिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील कौसर कॉलनी येथे मध्यरात्री छापा टाकून निदा खानला ताब्यात घेतले. ती आपल्या आई-वडील, भाऊ आणि आत्यासोबत त्या फ्लॅटमध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अटकेनंतर आज निदा खान हिला नाशिक रोड न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मतीन पटेलने दिला होता आश्रय
नाशिक : टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील फरार मुख्य संशयित निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय देण्यासाठी स्थानिक एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यास नोटीस बजावली असून त्यांचा मोबाईलही जप्त केला आहे. निदा गेल्या पाच दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्याला होती. नगरसेवक मतीन पटेल यांच्या संपर्कात आल्यानंतर तिने कुटुंबासह शहरात येण्याचा निर्णय घेतला. पटेल यांनी दोन महिन्यांपूर्वी नारेगाव येथील कौसर पार्क परिसरात एक नवीन फ्लॅट विकत घेतला होता, जिथे निदा खानला ठेवण्यात आले होते.