Nashik : त्र्यंबकेश्वरला पूजेच्या नावाखाली फसवणूक; बनावट संकेतस्थळाचा आधार, देवस्थानच्यावतीने पोलिसांत तक्रार

बनावट संकेतस्थळ बनवून पूजा विधीच्या नावाखाली भाविकांची फसवणूक होत असल्याची गंभीर बाब श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे उघडकीला आली आहे.
Nashik : त्र्यंबकेश्वरला पूजेच्या नावाखाली फसवणूक; बनावट संकेतस्थळाचा आधार, देवस्थानच्यावतीने पोलिसांत तक्रार
Nashik : त्र्यंबकेश्वरला पूजेच्या नावाखाली फसवणूक; बनावट संकेतस्थळाचा आधार, देवस्थानच्यावतीने पोलिसांत तक्रार (Photo-@nativeplanet)
Published on

नाशिक : बनावट संकेतस्थळ बनवून पूजा विधीच्या नावाखाली भाविकांची फसवणूक होत असल्याची गंभीर बाब श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे उघडकीला आली आहे. खुद्द देवस्थानच्यावतीने तशा आशयाची तक्रार पोलीस ठाण्यात दिल्याने खळबळ उडाली आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन आर्थिक व्यवहार करून भाविकांना गंडा घातला जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सध्या पवित्र श्रावण महिना सुरू असून देशभरातील भाविक धार्मिक विधीसाठी त्र्यंबकेश्वर येथे येत असतात. या स्थितीचा लाभ उठवण्यासाठी काहींनी बनावट संकेतस्थळ बनवून पूजा विधीच्या नावाखाली भाविकांकडून पैसे उकलण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. या संकेतस्थळावर त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहातील छायाचित्र प्रसृत करण्यासह सवलतीच्या दरांत पूजाविधी करण्याचे आमीष दाखवण्यात आल्याचा दावा देवस्थानच्यावतीने देण्यात आलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. शारावणी सोमवार जलाभिषेक, गोदावरी जलाभिषेक, बिल्वपत्र अभिषेक इत्यादी धार्मिक सेवांच्या नावाखाली विविध भागातील भाविकांकडून ऑनलाईन रक्कम स्वीकारण्यात येत आहे. यासाठी बनावट अॅप्लिकेशन्सचादेखील वापर होत असल्याचे देवस्थानाने निदर्शनाला आणून दिले आहे.

कठोर कारवाई करा!

अशा प्रकारामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थानची प्रतिमा मलीन होत असून जगभर असलेली विश्वासार्हता धोक्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. समाज माध्यमांवरील हे बनावट संकेतस्थळ तसेच अॅप्लिकेशन्स तत्काळ हटवण्यात यावे तसेच संबंधित बँक खाते, यूपीआय आयडी, पेमेंट गेट वे आणि तत्सम आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी. शहराची प्रतिमा मलीन करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर देवस्थानची तक्रार प्राप्त झाली असून सायबर विभागाच्यावतीने अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पोलीस खात्याच्या वतीने देण्यात आली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in