Nashik : पितृपक्षात महागाईचा भडका; भाजीपाल्याचे दर कडाडले; मेथी, कारले, कोथिंबिरीचे दर वधारले; लसूण स्थिर

ऑक्टोबर हिटच्या वाढत्या तीव्रतेमुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, नाशिक जिल्ह्यात पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या दरांत वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात पालेभाज्यांच्या दरांत २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे.
पितृपक्षात महागाईचा भडका; भाजीपाल्याचे दर कडाडले; मेथी, कारले, कोथिंबिरीचे दर वधारले; लसूण स्थिर
पितृपक्षात महागाईचा भडका; भाजीपाल्याचे दर कडाडले; मेथी, कारले, कोथिंबिरीचे दर वधारले; लसूण स्थिर'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

हारून शेख/लासलगाव

ऑक्टोबर हिटच्या वाढत्या तीव्रतेमुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, नाशिक जिल्ह्यात पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या दरांत वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात पालेभाज्यांच्या दरांत २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे. पितृपक्षाच्या काळात मागणी कायम असताना बाजारातील आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा चटका वाढल्याने भाजीपाला पिकांना अधिक पाण्याची गरज भासत आहे. उष्णतेचा परिणाम उत्पादनावर झाल्याने बाजार समित्यांमधील आवक कमी झाली आहे. लासलगाव, येवला आणि चांदवड बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी घटल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने घाऊक बाजारातील दर वाढले असून, त्याचा परिणाम किरकोळ बाजारातही जाणवत आहे. काही फळभाज्यांचे दर प्रतिकिलो ६० ते १०० रुपयांपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे.

मेथी, कोथिंबीर, पालक आणि कारले यांच्या दरांत विशेष वाढ झाली आहे. मेथीची जुडी २० ते ३० रुपयांना, कोथिंबिरीची जुडी २० ते ३० रुपयांना, तर पालकाची जुडी २० ते २५ रुपयांना विकली जात आहे. कारले आणि डांगराच्या दरांतही वाढ झाली आहे. दुसरीकडे, लसणाचे दर ११० ते १३० रुपये प्रतिकिलो या पातळीवर स्थिर आहेत.

लासलगाव उपबाजारातील भाजीपाल्याचे दर

लासलगाव बाजार समितीच्या खानगावनजीकच्या उपबाजारातील उपलब्ध माहितीनुसार, हिरवी मिरची ४७ ते ५८ रुपये, लसूण ११० ते १३० रुपये प्रतिकिलो, गिलके २६ रुपये, कारले २० रुपये आणि काकडी २८ रुपये दराने विकली जात आहे. मेथीची आवक गेल्या दोन दिवसांपासून झालेली नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. उन्हाची तीव्रता कायम राहिल्यास भाजीपाल्याच्या उत्पादनावर आणि बाजारातील आवकेवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात दर आणखी वाढणार की आवक सुधारल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in