नराधमाला फाशी! नसरापूर अत्याचारप्रकरणी ५५ दिवसांत निकाल; आरोपीला सोडणे समाजासाठी घातक- न्यायालयाचे मत

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी पुण्याच्या सत्र न्यायालयाने सोमवारी ऐतिहासिक निकाल दिला. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी या प्रकरणातील नराधम आरोपी भीमराव कांबळे याला 'मरेपर्यंत फाशी'ची शिक्षा सुनावली.
नराधमाला फाशी! नसरापूर अत्याचारप्रकरणी ५५ दिवसांत निकाल; आरोपीला सोडणे समाजासाठी घातक- न्यायालयाचे मत
नराधमाला फाशी! नसरापूर अत्याचारप्रकरणी ५५ दिवसांत निकाल; आरोपीला सोडणे समाजासाठी घातक- न्यायालयाचे मत
Published on

पुणे : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी पुण्याच्या सत्र न्यायालयाने सोमवारी ऐतिहासिक निकाल दिला. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी या प्रकरणातील नराधम आरोपी भीमराव कांबळे याला 'मरेपर्यंत फाशी'ची शिक्षा सुनावली. अवघ्या ५५ दिवसांत लागलेला हा निकाल राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्यांपैकी एक ठरला असून पीडितेला अखेर न्याय मिळाला आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.

या खटल्यात कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध नव्हता. संपूर्ण खटला हा परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता. पोलिसांनी या प्रकरणात ८२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते, ज्यापैकी ५५ महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी अवघ्या १६ दिवसांत पूर्ण करून एक मोठा टप्पा पार केला. डीएनए, वैज्ञानिक पुराव्यांनी गुन्हा सिद्ध

वैज्ञानिक पुराव्यांच्या बाबतीतही सरकारी पक्षाने भक्कम बाजू मांडली. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, मृत मुलगी आणि आरोपीचा डीएनए जुळला आहे. मुलीच्या तोंडात कोंबलेल्या कपड्यावर आरोपीची लाळ, रक्त आणि वीर्याचे अंश सापडले, तसेच तिच्या हातावरही आरोपीचे वीर्य आढळून आले आहे. तपास यंत्रणेने प्रत्येक पुरावा पंचांसमक्ष जप्त करून 'चेन ऑफ कस्टडी' अत्यंत चोखपणे पाळल्यामुळे पुराव्यांमध्ये कोणत्याही फेरफाराला वाव उरला नाही, असे न्यायालयानेही मान्य केले.

गेल्या वर्षी एक मे महाराष्ट्र दिनी ही हृदयद्रावक घटना घडली होती. आरोपी भीमराव कांबळे याने साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवून गोठ्यात नेले आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने दगडाने ठेचून तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. शवविच्छेदन अहवालात चिमुरडीच्या शरीरावर तब्बल १८ गंभीर जखमा आढळून आल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत वेगाने तपास करत २४ तासांच्या आत आरोपीला अटक केली आणि केवळ १४ ते १६ दिवसांत १२०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

‘लास्ट सीन टुगेदर' थिअरीचा प्रभावी वापर

'लास्ट सीन टुगेदर' या थिअरीनुसार, पीडित चिमुरडी जेव्हा शेवटची जिवंत बघण्यात आली, तेव्हा ती केवळ आरोपी भीमराव कांबळेच्या सोबत होती. आरोपीने तिला गाईचे वासरू दाखवण्याचे आणि 'गाठीशेव' देण्याचे आमिष दाखवून सोबत नेले होते. पोलिसांनी नसरापूर गावातील एकूण ६ सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले. या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसले की, दुपारी ३ वाजून १२ मिनिटांनी आरोपी त्या मुलीला सोबत घेऊन जात होता आणि त्यानंतर दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांनी तो तिथून एकटाच बाहेर पडला. आरोपीने पीडितेसोबत घालवलेला हा ३९ मिनिटांचा कालावधी आणि त्यानंतर पीडितेचा झालेला मृत्यू, हा 'लास्ट सीन टुगेदर' थिअरीचा सर्वात महत्त्वाचा भाग ठरला. या ३९ मिनिटांत आरोपीशिवाय पीडितेच्या संपर्कात दुसरे कोणीही नव्हते, हे पोलिसांनी सिद्ध केले.

आरोपीला सोडणे समाजासाठी अत्यंत घातक

आरोपीचे वय ६५ वर्षे असले तरी त्याची वासना आणि विकृती संपलेली नाही. अशा माणसाला जर जन्मठेप दिली किंवा समाजात मोकळे सोडले, तर तो समाजासाठी अत्यंत घातक ठरेल आणि समाजाला चुकीचा संदेश जाईल, असे सरकारी वकिलांनी सांगितले. ही घटना केवळ समाजालाच नाही तर न्यायदेवतेच्या विवेकालाही धक्का देणारी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. अशा परिस्थितीत पीडितेच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आणि जनतेचा कायद्यावरील विश्वास कायम ठेवण्यासाठी सर्वोच्च शिक्षा देणे आवश्यक होते.

भीमराव कांबळेने केला स्वतःचा बचाव

दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीने त्याच्यावर लावलेले सर्व आरोप पूर्णपणे नाकारले होते. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३५१ अंतर्गत आपला जबाब नोंदवताना त्याने असा बचाव घेतला की, त्याने त्या मुलीला केवळ गाईचे वासरू दाखवण्यासाठी गोठ्याकडे नेले होते. त्याने असा युक्तिवाद केला की, त्याने मुलीला कडेवर घेतले होते आणि चालताना गोठ्यातील पाईपमध्ये त्याचा पाय अडकला. त्यामुळे तो खाली पडला आणि त्याच्यासोबत ती मुलगीही खाली पडली. तो खाली पडल्यामुळे त्या मुलीला जखमा झाल्या आणि ती रडू लागली. तिचे रडणे थांबत नव्हते, म्हणून त्याने तिला तिथेच एका कॉटवर ठेवले आणि तो निघून गेला.

कुटुंबीयांकडून निकालाचे स्वागत

निकाल जाहीर होताच न्यायालय परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मुलीच्या कुटुंबीयांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत न्यायव्यवस्थेने आपल्या मुलीला न्याय दिल्याची भावना व्यक्त केली.

न्यायाधीशही गहिवरले

न्यायाधीशांनी आपल्या निरीक्षणात नमूद केले की, आरोपीचे वय ६५ वर्षे असले तरी त्याने केलेले कृत्य इतके अमानुष आहे की वयाचा विचार करून त्याला दया दाखवता येणार नाही. आरोपीला बलात्कार, खून आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली दोषी धरून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष म्हणजे, निकाल वाचताना या घटनेच्या भीषणतेमुळे स्वतः न्यायाधीशही काही काळ गहिवरले होते आणि त्यांनी पाण्याचे दोन घोट घेऊन स्वतःला सावरत निकाल वाचन पूर्ण केले. आरोपीच्या पत्नीने आणि मुलांनीही आधीच त्याची साथ सोडली असून, त्याला कठोर शिक्षा व्हावी अशीच त्यांचीही भूमिका होती. निकाल लागल्यानंतर न्यायालयाच्या बाहेर पीडितेच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले होते.

‘दुर्मिळातील दुर्मिळ’ गुन्हा

न्यायालयाने नमूद केले की, आरोपीने केवळ तीन वर्षांच्या चिमुरडीवर अमानवी अत्याचार केले नाहीत, तर तिच्या शरीरावर १८ गंभीर जखमा होत्या. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, बालिकेचा मृत्यू झाल्यानंतरही आरोपीने तिच्या मृतदेहावर अत्याचार केले, ज्याला सरकारी वकिलांनी 'क्रूरतेचा कळस' म्हटले आहे.

फाशी होईल त्याच दिवशी खरा न्याय : आईची प्रतिक्रिया

गुन्हेगाराला झालेली शिक्षा योग्यच आहे. परंतु, ज्या दिवशी या नराधमाला फाशी होईल त्याच दिवशी आमच्या लेकीला खरा न्याय मिळाला, असे आम्ही समजू’, अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या आईने दिली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in