

पुणे : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुकलीच्या लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणाचा अंतिम निकाल येत्या २५ जून रोजी लागणार आहे.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपी भीमराव कांबळे याने विशेष न्यायाधीश एस.आर.साळुंखे यांच्यासमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून, दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद शनिवारी पूर्ण झाला आहे. हा खटला राज्यातील सर्वात जलदगतीने चालविलेला खटला ठरण्याची दाट शक्यता असून, अवघ्या महिनाभरात या प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे.
विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीत आरोपी भीमराव कांबळे याला कडक पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. न्यायालयाच्या सोप्या भाषेतील प्रश्नांनंतर आणि सीसीटीव्ही चित्रीकरण झूम करून दाखवल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. शनिवारी झालेल्या अंतिम युक्तिवादात विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आरोपीच्या क्रूरतेवर प्रकाश टाकला. तांत्रिक पुराव्यांनुसार, सरकारी पक्षाने न्यायालयात दावा केला की, पीडितेच्या मृत्यूनंतरही आरोपीने तिच्या मृतदेहावर अत्याचार केले.