राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, शरद पवार गटाला मिळाले नवीन नाव

शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाने 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' हे नाव दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, शरद पवार गटाला मिळाले नवीन नाव

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार यांना दिले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. आता पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह हा मोठा प्रश्न पवार गटासमोर होता. शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाने 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' हे नाव दिले आहे. पक्षाच्या चिन्हावर मात्र अद्याप काही निर्णय झाला नसला तरी शरद पवार गट वटवृक्ष या चिन्हासाठी आग्रही असल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे सुनावणीनंतर आयोगाने अजित पवार गटाला दिले. शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणूनही मान्यता देण्यात आली. त्यानंतर शरद पवार गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला काही पर्याय द्यायचे होते. त्यामध्ये शरद पवार गटाने नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार ही तीन नावे दिली होती. त्यामध्ये निवडणूक आयोगाने 'नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' म्हणजे 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' हे नाव त्यांना दिले आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिल्यानंतर त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्हाची सूचना करण्याचे निर्देश दिले होते. शरद पवार गट हा वटवृक्ष या नव्या चिन्हासाठी आग्रही असल्याचेही समजते. आयोगाला आता या चिन्हाबाबत पडताळणी करावी लागेल. नोंदणीकृत निवडणूक चिन्हांच्या यादीत या चिन्हाचा समावेश आहे का नाही, तसेच हे चिन्ह अन्य कोणत्या पक्षाला देण्यात आले आहे किंवा नाही, आदी सर्व तांत्रिक बाबी तपासून मगच हे चिन्ह आयोग पक्षाला देतो.

लोकसभा निवडणूका आता तोंडावर आल्या आहेत. शरद पवार गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह लवकरच मिळणे हे यामुळेच आवश्यक होते. कारण पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह हे त्यांच्या मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचे काम त्यांना करावे लागणार आहे. सोशल मीडियाच्या जमान्यात हे पोहोचविणे सोपे असले तरी इतकी वर्षे पक्षाचे चिन्ह जे मतदारांच्या अंगवळणी पडलेले असते ते बदलून नवीन चिन्ह रूजविणे हे कठीण काम असते. शरद पवार गटाला हे आव्हान पेलावे लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in