लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत नवीन पटनायक पहिल्या क्रमांकावर; एकनाथ शिंदे यांना पहिल्या दहातही स्थान नाही

महाराष्ट्रात शिवसेना काबीज करत भाजपसोबत सत्ता स्थापन केलेले शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात खूप मागे पडले आहेत.
लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत नवीन पटनायक पहिल्या क्रमांकावर; एकनाथ शिंदे यांना पहिल्या दहातही स्थान नाही

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. हीच निवडणूक आज झाली तर भाजपप्रणीत एनडीएला किती आणि इंडिया आघाडी व विरोधकांना किती जागा मिळणार, याचे दोन दिवसांपूर्वीच अंदाज आले होते. यातच देशातील विविध राज्यांपैकी त्या त्या राज्यात कोणते मुख्यमंत्री सर्वाधिक पसंतीचे आहेत, याचीही आकडेवारी ‘इंडिया टुडे’च्या मूड ऑफ द नेशनमध्ये देण्यात आली होती. यामध्ये ओदिशाचे सीएम नवीन पटनायक यांना सर्वाधिक पसंती असल्याचे दिसत आहे. परंतु या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा क्रमांक शेवटून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

महाराष्ट्रात शिवसेना काबीज करत भाजपसोबत सत्ता स्थापन केलेले शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात खूप मागे पडले आहेत. शिंदे यांना महाराष्ट्रातून अवघी १.९ टक्के लोकांचीच मते पडली आहेत. शिंदे यांची राज्यात पसंती खूपच कमी झाली आहे, हे यावरून दिसून येत आहे. या यादीत शिंदे यांचा शेवटून तिसरा क्रमांक लागत आहे.

नवीन पटनायक यांना ५२.७ टक्के जनतेने पसंतीचे असल्याचे म्हटले आहे, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांना ४६.९% टक्के जनतेने पसंती दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर आसामचे हिमंता बिस्वा सरमा ४८.६ टक्के मते घेऊन आले आहेत. गुजरातचे सीएम भूपेंद्र पटेल हे ४२.६ टक्के मतांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. यानंतर त्रिपुराचे मानिक साहा, गोव्याचे प्रमोद सावंत, उत्तराखंडचे पुष्कर सिंह धामी, दिल्लीचे अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे एम. के. स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांचा नंबर लागत आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिल्या दहातही नंबर आलेला नाही.

logo
marathi.freepressjournal.in