
मुंबई : विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून ६५ किमी अंतरावर नवेगाव बांध येथे राष्ट्रीय पक्षी उद्यान आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये एमटीडीसीचे नवेगाव बांध पर्यटक निवास नवेगाव नागझीरा व्याघ्र प्रकल्पाभोवती शाश्वतरित्या उभारले आहे. याठिकाणी बोटींग, पक्षी निरीक्षण, जंगलातील विविध प्राण्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे. नवेगाव बांध पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नवेगाव बांध लोकार्पण सोहळा आभासी पद्धतीने पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पर्यटन मंत्री शंभूराज देसाई,पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक,पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी उपस्थित होते.
२२ नोव्हेंबर १९७५ या दिवशी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. घनदाट जंगल गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेला असून गोंदियापासून ६५ कि.मी. अंतरावर नवेगाव बांध येथे राष्ट्रीय पक्षी उद्यान आहे. वनश्रीने नटलेल्या या उद्यानाचा परिसर १६५ चौ.कि.मी. आहे. तलाव व वनक्षेत्र पक्षांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. सैबेरियासारख्या अतिदूर प्रदेशाहून येणारे पक्षी विशिष्ट हंगामात दरवर्षी येतात. नवेगाव बांध हा तलाव ११ कि. मी. परिसरात पसरलेला आहे. या तलावाच्या मध्यभागी प्रेक्षणीय असे 'माल डोंगरी' बेट आहे. या जंगलाचा भाग हा नागझिरा अभयारण्यापासून सुरु होऊन गडचिरोली जिल्ह्यातून थेट छत्तीसगढपर्यंत जातो. हा जंगल प्रदेश हत्तींचा येण्या -जाण्याचा मार्ग होता व म्हणूनच नागझिरा अभयारण्यातील हत्ती खोदरा व नवेगाव अभयारण्यातील हत्ती पंगडी या ठिकाणांना तशा प्रकारची नावे मिळाली. नवेगाव बांध हे एक आदर्श पर्यटन स्थळ आहे, जिथे तुम्ही बोटिंग करू शकता, पक्षी निरीक्षण करू शकता आणि आसपासच्या जंगलातील विविध प्राणी पाहू शकता. येथील प्राचीन आणि शांत वातावरण पर्यटकांना निसर्गाच्या जवळ आणते.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई,राज्यमंत्री इंद्रनील नाईक,सचिव जयश्री भोज यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, , मपविम मुंबईचे अधिक्षक अभियंता शैलेंद्र बोरसे, प्रादेशिक कार्यालय, नागपूर चे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक दिनेश कांबळे प्रयत्न करत आहेत.
तीर्थस्थळ, निसर्गाची अप्रतिम सुंदरता
प्रतापगड गाव डोंगर परिसरात हा उभा असलेला ऐतिहासिक किल्ला, शिवतीर्थ, मोरगांव - अर्जूनी तालुक्यातील प्रसिध्द यात्रा स्थळ आहे. गोंदिया जिल्हयातील सर्वात मोठे यात्रा स्थळ आहे. पर्वतावर असणारा दर्गा-शिवमंदिर आकर्षणाचे केंद्र आहे. या परिसराला डोंगर राजाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. ५० कि.मी. लांब भुयार सहानगड किल्ला (सानगडी पर्यंत) आहे. येथून हे सर्व स्थळे सहजपणे भेट देता येतात आणि प्रत्येक ठिकाणी पर्यटकांना निसर्गाची अप्रतिम सुंदरता अनुभवायला मिळते.
नवेगाव बांध पर्यटकांचे आकर्षण केंद्र
इटियाडोह धरण हे गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांसाठी असलेला हा पाटबंधारे प्रकल्प मोरगांव अर्जुनी तालुक्यात आहे. कटला मासा व कोळंबीसाठी हा प्रकल्प प्रसिध्द आहे. तिबेटिया कारपेट बनविण्याचे केंद्र येथून जवळच आहे.
स्विमिंग पूल, उपहारगृह, व्हीआयपी सूट
नवेगाव बांध या पर्यटन स्थळी पर्यटकांना राहण्यासाठी महामंडळाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून २१ कोटींच्या निधीतून उत्तम सुविधेने सज्ज असलेले पर्यटक निवास चांदपूर या नावाने सुरू केलेले आहे. व्हीआयपी सूट, डीलक्स सूट, स्टॅंडर्ड सूट आणि ८ बेडेड डॉर्मिटरी, उपहारगृह आणि मनोरंजनासाठी स्विमींगपूल इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.येथे एकूण डिलक्स १८ सुट, लेडीज २ डॉरमेटरी सुट,जेन्ट्स डॉरमेटरी १ सूट,१ चेंजिंग रूम,१ मॅनेजर रूम,१ वेटींग रूम आहे.
प्राण्यांच्या ३४ प्रजाती, पक्ष्यांच्या १६६ प्रजाती
नागझीरा अभयारण्याचे क्षेत्रफळ १५२.८१ चौ.कि.मी. असून यामध्ये सस्तन प्राण्यांच्या ३४ प्रजाती, पक्ष्यांच्या १६६ प्रजाती तर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ३४ प्रजाती पाहावयास मिळतात. येथील जंगलात प्रामुख्याने चितळ, सांबर, वाघ, अस्वल, गवा इत्यादी प्राणी व तितर, मोर आदी पक्षी आढळतात. शोभेची झाडे, सुवासिक व औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आणि आर्थिकदृष्टया महत्वाची सुमारे २०० प्रकारचे वृक्ष तसेच पर्यावरणाविषयी जनजागृतीसाठी अभयारण्यामध्ये एक वस्तू संग्रहालय आहे.