‘गोकुळ’च्या चेअरमनपदी नवीद मुश्रीफ

कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाची सहकारी संस्था असलेल्या ‘कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित’च्या (गोकुळ) अध्यक्षपदी संचालक नवीद मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर शुक्रवारी सर्व संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
‘गोकुळ’च्या चेअरमनपदी नवीद मुश्रीफ
Published on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाची सहकारी संस्था असलेल्या ‘कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित’च्या (गोकुळ) अध्यक्षपदी संचालक नवीद मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर शुक्रवारी सर्व संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

‘गोकुळ’च्या इतिहासात पहिल्यांदाच राज्य पातळीवरील महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांना तत्काळ राजीनामा देऊ नये, अशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे गोकुळच्या सर्व संचालक आणि स्थानिक नेत्यांनी डोंगळे यांनी राजीनामा देण्याची मागणी केली होती. मात्र, या सर्व घडामोडीमुळे अध्यक्षपदाच्या निवडीला काहीसा ब्रेक बसला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, गोकुळचा अध्यक्ष महायुतीचाच व्हावा, अशा अपेक्षा राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केल्या होत्या. त्यानुसार डोंगळे यांनी राजीनामा देण्यास विलंब केला.

अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना गोकुळच्या राजकारणात लक्ष न देण्याची विनंती केली. त्यानंतर अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिला आणि गोकुळच्या अध्यक्षपदासाठी शर्यत खऱ्या अर्थाने सुरू झाली.

गेल्या आठ दिवसांपासून गोकुळचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव, विद्यमान संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, अध्यक्षपद महायुतीचाच व्हावा, या भूमिकेतून राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेत्यांवर दबाव आणला. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी महायुतीचे मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार चंद्रदीप नरके, विनय कोरे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्यात झालेल्या बैठकीनंतर नवीद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नवीद मुश्रीफ यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर मुश्रीफ समर्थकांनी गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.

गोकुळचे नूतन चेअरमन नवीद मुश्रीफ म्हणाले की, गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी माझी एकमताने निवड करून जो विश्वास माझ्यावर दाखवण्यात आला आहे. त्याबद्दल मी शाहू आघाडीचे सर्व नेते मंडळी, माझे सहकारी संचालक मंडळ तसेच माझ्या शेतकरी बांधवांचे मनपूर्वक आभार मानतो. मी भविष्यात काम करत असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी कटिबद्ध असून दूध संकलन, प्रक्रिया आणि विक्री व्यवस्था अधिक पारदर्शक व कार्यक्षम राबूवन नव्या तंत्रज्ञानाचा, व्यवस्थापन प्रणालींचा समावेश करून गोकुळची गुणवत्ता आणि ब्रँडची विश्वासार्हता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणार आहे. तसेच या दुग्ध व्यवसायामध्ये महिला व युवा शेतकरी अधिक सक्रीय होण्यासाठी त्यांना गोकुळमार्फत प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न असेल.

गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याची वाढती मागणी लक्षात घेता येत्या नजीकच्या काळात गडमुडशिंगी येथे टीएमआर प्लांट विस्तारीकरण व पशुखाद्य कारखान्याचे नूतनीकरण करण्याचे नियोजन आहे. मुंबई, पुणे येथील दूध उत्पादनाची मागणी लक्षात घेता नवी मुंबईत वाशी येथे उभारणी केलेल्या १५ मे. टन क्षमतेचा दही प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.

सहकार आमचा धर्म!

मी कोणत्याही गट-तटाच्या पलीकडे जाऊन, "सहकार हा आमचा धर्म" या मूल्याशी प्रामाणिक राहून कार्य करीन. गोकुळ ही संस्था सर्वांसाठी खुली, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक राहील, यासाठी मी कटिबद्ध आहे. ही निवड ही केवळ माझी नाही, तर आपणा सर्वांच्या विश्वासाची आणि एकतेची निवड असल्याचे मनोगत नवीद मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

logo
marathi.freepressjournal.in