हनुमान जयंतीची जोरात तयारी; राणा दाम्पत्याचे मुंबई, अमरावतीत बॅनरबाजी

हनुमान जयंती जवळ येत असल्याने अमरावती आणि मुंबईत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत
हनुमान जयंतीची जोरात तयारी; राणा दाम्पत्याचे मुंबई, अमरावतीत बॅनरबाजी
Published on

हनुमान जयंती जवळ येत असल्याने अमरावती आणि मुंबईत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत. भगवी शाल परिधान केलेल्या नवनीत राणा यांचा मोठा फोटो या बॅनरवर लावण्यात आला आहे. त्या बॅनरवर नवनीत राणा यांचा उल्लेख ‘हिंदू शेरनी’ असा केला आहे. ६ एप्रिलला हनुमान जयंती साजरी होणार असून त्यादृष्टीने अमरावतीमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबई आणि अमरावती या दोन्ही ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत.

नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनी, 'आम्ही मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा म्हणू,' असे सांगितले होते. नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघे मुंबईत आले असता त्यांना मातोश्रीवर जाण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर, 'आम्ही हनुमान चालीसा म्हणणार नाही,' असे सांगूनही दोघांना अटक करण्यात आली. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दोघांनाही १४ दिवस तुरुंगात राहावे लागले होते. या सर्व संघर्षाचे फोटो या बॅनरवर लावण्यात आले आहेत. अमरावतीत हनुमानाची भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे. त्या मूर्तीचा फोटोही या बॅनरवर आहे. तसेच बॅनरवर ‘हिंदुत्व हाच श्वास धर्मरक्षणाची आस’ असा संदेश लिहिला आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रेही लावण्यात आली आहेत.

हनुमान चालिसाच्या पठणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या राणा दाम्पत्याच्या पुढाकाराने अमरावतीत १११ फूट उंच हनुमानाची मूर्ती उभारण्यात येणार आहे. अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात हे मंदिर उभारले जात आहे. या भव्य मूर्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. हनुमान जयंतीनिमित्त ६ एप्रिल रोजी भूमिपूजन होणार असून त्यानिमित्त राणा दाम्पत्याने सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला भाजप आणि शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in