अमरावतीतून नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी

भाजपने याआधी २३ उमेदवार जाहीर केले आहेत. राणा यांच्या उमेदवारीने आता महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारांची संख्या २४ झाली आहे. मात्र, नवनीत राणा यांची उमेदवारी घोषित होताच बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांनी मात्र त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.
अमरावतीतून नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी

मुंबई : भाजपकडून अमरावती लोकसभा मतदारसंघात खा. नवनीत राणा यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. यामुळे आता नवनीत राणा या भाजपच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. भाजपने देशभरातील उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रात नवनीत राणा यांचा समावेश आहे.

भाजपने याआधी २३ उमेदवार जाहीर केले आहेत. राणा यांच्या उमेदवारीने आता महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारांची संख्या २४ झाली आहे. मात्र, नवनीत राणा यांची उमेदवारी घोषित होताच बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांनी मात्र त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

गेल्या निवडणुकीत नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. राणा राष्ट्रवादीच्या पुरस्कृत उमेदवार होत्या. मात्र, गेल्या पाच वर्षात राज्यातील सत्ता समीकरणे बदलली. महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्रीपदावर असलेल्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत राणा दांपत्याचा संघर्ष झाला. ‘हनुमान चालिसा’ वाचण्यावरून मोठे महाभारत घडले होते. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. आता नवनीत राणा यांना भाजपने अमरावतीतून अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. नवनीत राणा या आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील. पण राणा यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही.

नवनीत राणा यांना पाडणार - बच्चू कडू

भाजपने अमरावती लोकसभा मतदारसंघातून खा. नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर प्रहार संघटनेचे नेते आ. बच्चू कडू यांनी राणा यांना निवडणुकीत पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांनी राणा यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला आहे. बच्चू कडू यांनी आपण राणा यांचा प्रचार करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. आनंदराव अडसूळ यांनी देखील बंडाची भाषा करत राणा यांना पूर्णपणे विरोध असेल, असे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in