नवनीत राणांना स्वकीयांचेच आव्हान; शिवसेनेची बंडखोरी? भाजपचे नेते नाइलाजाने राणांच्या प्रचारात?

नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यास अमरावतीतील खुद्द भाजप नेत्यांनीच विरोध केला. स्थानिक पातळीवरून प्रचंड विरोध असतानाही भाजपने स्थानिक नेतृत्वाचा विचार न करता थेट नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. आता त्यांच्या कार्यक्रमात भाजपचे नेते नाइलाजाने सहभागी होत आहेत.
नवनीत राणांना स्वकीयांचेच आव्हान;  शिवसेनेची बंडखोरी? भाजपचे नेते नाइलाजाने राणांच्या प्रचारात?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना आता भाजपने थेट पक्षाची उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी युवा स्वाभिमानी पक्षाचा राजीनामा देऊन त्या भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. मात्र, राणा यांना भाजपसह महायुतीकडूनच प्रचंड विरोध आहे. काँग्रेसने येथे बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानखेडे अशी लढत होईल, असे वाटत असताना आता महायुतीतूनच बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी पर्यायी उमेदवार मैदानात उतरविण्याचा इशारा दिला, तर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. त्यामुळे महायुतीत वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे.

नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यास अमरावतीतील खुद्द भाजप नेत्यांनीच विरोध केला. स्थानिक पातळीवरून प्रचंड विरोध असतानाही भाजपने स्थानिक नेतृत्वाचा विचार न करता थेट नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. आता त्यांच्या कार्यक्रमात भाजपचे नेते नाइलाजाने सहभागी होत आहेत.

निर्णय एकतर्फी

नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याचा एकतर्फी निर्णय घेतला गेला आहे. खरे तरे सर्वांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आम्हाला सांगितले गेले होते. परंतु परस्परच उमेदवारीचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे आमचा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध आहे, असे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ म्हणाले.

‘एकवेळ राजकारण सोडेन, पण राणांचा प्रचार नाही’

यासोबतच शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी तर अगोदरच विरोध केलेला आहे. एवढेच काय तर एकवेळ राजकारण सोडेन, परंतु राणांचा प्रचार करणार नाही, असे म्हटलेले आहे. त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा किती विरोध आहे, याचा अंदाज येतो.

राणांविरोधात गुलाल उधळणार

नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनीही भाजपवर जोरदार हल्लाबोल केला असून, कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणा यांना पराभूत करून विजयाचा गुलाल उधळू, असे म्हटले आहे. प्रसंगी सक्षम उमेदवार मैदानात उतरवून लढाई जिंकू, असे ते म्हणाले.

सर्वपक्षीय नेते एकत्र

नवनीत राणांबद्दल या अगोदर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती. तसेच महायुतीतील नेत्यांनीही राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. तसेच भाजपच्या नेत्यांचाही विरोध आहे. प्रहारचे नेते बच्चू कडू आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही राणांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे. आता या उमेदवारीच्या विरोधात आम्ही सर्वपक्षीय नेते एकत्रित आहोत. त्यामुळे त्यांच्यासाठी उमेदवारी सोपी नाही. वेळ आली तर अपक्ष मैदानात उतरू, असेही अडसूळ म्हणाले

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in