निराधार दुर्गांची जीवनभरारी! सीए कल्पना झालीय दुरितांचा आधारवड; राज्य शासनानेही ‘स्त्री गौरव’ पुरस्काराने गौरविले

Navratri 2024 : व्यसनाधीन वडिलांच्या बेजबाबदार वागण्यामुळे कल्पना आणि तिच्या आईला आयुष्यात अनेक संघर्षमय प्रसंगांना तोंड द्यावे लागले. या प्रकारांनी जराही निराश वा विचलीत न होता बालगृहात राहणाऱ्या कल्पना दाभाडे हिने दुर्दम्य इच्छाशक्तीच्या व अविश्रांत मेहनतीच्या जोरावर सीए- सनदी लेखापाल होण्याचे आपले स्वप्न साकार केले.
निराधार दुर्गांची जीवनभरारी! सीए कल्पना झालीय दुरितांचा आधारवड; राज्य शासनानेही ‘स्त्री गौरव’ पुरस्काराने गौरविले
Published on

गायत्री पाठक-पटवर्धन/पुणे: व्यसनाधीन वडिलांच्या बेजबाबदार वागण्यामुळे कल्पना आणि तिच्या आईला आयुष्यात अनेक संघर्षमय प्रसंगांना तोंड द्यावे लागले. या प्रकारांनी जराही निराश वा विचलीत न होता बालगृहात राहणाऱ्या कल्पना दाभाडे हिने दुर्दम्य इच्छाशक्तीच्या व अविश्रांत मेहनतीच्या जोरावर सीए- सनदी लेखापाल होण्याचे आपले स्वप्न साकार केले. कल्पनाला आतापर्यंत अनेक सामाजिक संस्था-संघटनांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. राज्य शासनानेही तिचा ‘स्त्री गौरव’ पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. ही कल्पनाची प्रेरक कहाणी आता समाजातील दुर्बल, उपेक्षित, वंचित, निराधारांचा आधारवड बनली आहे.

कल्पनाचे वडील आचारी म्हणून काम करत. आई लोकांच्या घरी धुणीभांड्याची कामे करायची. वडील अचानक घरातून वर्ष वर्ष निघून जायचे. या काळात कल्पनाच्या आईने एकटीने संसार रेटला. आई जिथे कामाला जाईल तिथे कल्पनाचे शिक्षण सुरू झाले. मधूनच वडील यायचे आणि आईचे दागदागिने, घरात असलेले पैसे घेऊन परागंदा व्हायचे. या अशा स्थितीत आईला प्रसंगी दारूच्या भट्टीवरही काम करावे लागे. तिथे विपरीत अनुभव येत. अशा वातावरणापासून आपल्या मुलीचे रक्षण करण्यासाठी आईने कल्पनाला निराधार मुलांसाठी असलेल्या बालगृहात ठेवण्याचा निर्णय घेतला. वयाच्या सातव्या वर्षी कल्पना पुण्यातील महिला सेवाग्राममध्ये दाखल झाली. सेवाग्रामची शाळा बंद झाल्याने नानापेठ इथल्या सुधारगृहात तिला घातले गेले. तिथून पुन्हा तिची बदली अनाथ हिंदू महिलाश्रमात झाली. पाचवी ते पदवीपर्यंतचे तिचे शिक्षण तिथे झाले. विपरीत परिस्थितीत जगणाऱ्या कल्पनाचा मूळचा स्वभाव सेवाभावी होता. म्हणूनच तिला नर्सिंगला जायचे होते. पण संस्थेने ते अमान्य केले. म्हणून इंग्रजी विषय कच्चा असूनही कल्पनाने अकरावीपासून इंग्रजी माध्यम घेऊन कॉमर्समध्ये करिअर करायचे ठरवले. त्यासाठी तिने इंग्रजी या विषयावर मेहनत घेतली. शिक्षणाचा संघर्ष सुरू असतानाच वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर बालगृहातून नियमाप्रमाणे बाहेर पडावे लागले. आईकडे जावे तर तिचाच जगण्याचा संघर्ष सुरू होता. त्यामुळे सुरक्षित निवासाची व्यवस्था बघणे, हे एक आव्हान कल्पनासमोर उभे राहिले. शिवाय पुढील शिक्षण घेत नोकरीही शोधायची होती. एकाच वेळी अनेक आव्हाने समोर होती. शिक्षणाआधी मिळेल ते काम करणे हेच ध्येय होते. अचानकपणे लातूरच्या भूकंपग्रस्त मुलांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेला अकाऊंटची गरज आहे हे कल्पनाला कळले. १५०० रुपये पगार आणि राहण्या-जेवणाची व्यवस्था एवढ्यावर कल्पनाने तिथे तीन वर्षे काम केले. तिथे आपल्याहून अधिक हलाखीत जगणाऱ्या गरीब मुली पाहून कल्पनाच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल झाला. आपण अधिक चांगलं शिक्षण घेऊन या अशा मुलींना मदत करण्यासाठी काही करायचे, असे कल्पनाने ठरवले. याचदरम्यान कल्पनाची आई आजारपणामुळे पुण्यात ससून रुग्णालयात दाखल झाली. त्यावेळी आपल्या आईची काळजी घेण्यासाठी कल्पनाने रुग्णालयातच आईच्या कॉटच्या खाली जमिनीवर दोन महिने काढले. त्याच आजारपणात तिची आई गेली.

आता कल्पनाला तिचे शिक्षण हाका मारत होते. स्वतः थोडे कर्ज काढून, अर्धवेळ नोकरी करून आणि काही सामाजिक संस्थांच्या मदतीने तिने एमबीए पूर्ण केले. एमबीए करत असतानाच तिने 'अक्षर आनंद' या संस्थेची स्थापना केली. बालगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्य, गोष्ट वाचन, काही होतकरू मुला-मुलींना शैक्षणिक मदत करणे हे काम संस्थेच्या माध्यमातून सुरू केले.

एमबीएचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये नोकरी मिळाली. तरीही तिने अजून चांगले शिक्षण घ्यावे, सीए करावे असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांनी तिला सुचवले आणि कल्पना अभ्यासाला लागली. नेमके त्याचदरम्यान वडील परत आले. त्यांना तिने वृद्धाश्रमात ठेवले. वर्षभरात वडील गेले. कल्पना सांगते, ‘आता मी टेन्शन फ्री झाले. त्यानंतरच्या पाच वर्षांत मी सीए, सनदी लेखापाल झाले.' केवळ बालगृहातल्याच नाही, तर सगळ्याच मुलींसाठी कल्पना हे प्रेरक उदाहरण आहे.

logo
marathi.freepressjournal.in