गायत्री पाठक-पटवर्धन/पुणे
बालगृहात राहणारी एक निराधार मुलगी अनेक खडतर आव्हानांना तोंड देत स्वकर्तृत्वावर नर्सिंगचे शिक्षण घेते. तेवढ्यावरच न थांबता नर्सिंगमधील शिक्षणाचे पुढचे पुढचे टप्पे गाठत जाते. तिच्या सबलीकरणाची ही अनोखी कहाणी.
पूजा शर्मा- काळभोर दोन वर्षांची असताना तिची आई वारल्यावर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. सावत्र आई धूण्याभांड्यांची कामे करून संसार चालवायची. पूजा सहा-सात वर्षांची होईपर्यंत झाल्यावर तीही एक-दोन घरची कामे करु लागली. वडील दारू पिऊन सावत्र आईला खूप मारायचे. लग्नानंतर सलग चार-पाच वर्ष आईने हा त्रास सहन केला आणि अखेरीस ती पोलिसांकडे गेली. शेवटी आईने घर सोडले. वडिलही घर सोडून गायब झाले. आईने घर सोडताना पूजाला ती ज्यांच्या घरी घरकाम करत असे तिथे सोडले होते. आता पूजाला तिथेच राहून सगळी कामे करणे भाग पडले. जेवण आणि निवारा या बदल्यात पूजाला त्या घरात पडेल ती कामे करावी लागत होती. सगळी काम करुनही पूजाच्या वाट्याला शिळे अन्न येई. अनेकदा शिक्षा म्हणून उपाशी ठेवले जाई. अशातच आपले वडिलही वारले हे पूजाला कळले. ती ज्यांच्याकडे राहत होती त्यांच्या त्रासाला वैतागून वयाच्या आठव्या वर्षी तिने घर सोडले.
घर सोडल्यावर पूजा रेल्वे पुलावर आली. रेल्वे पोलिसांनी तिला पाहिले आणि तिची रवानगी चेंबूरच्या शिशुगृहात केली. तोपर्यंत तिच्या शिक्षणाचा पत्ताच नव्हता. आठ वर्षांची होईपर्यंत तिला ना आई-वडिलांनी शाळेत घातले ना घरकाम करवून घेणाऱ्या बाईने घातले. बालगृहात गेल्यावरही शिशुगृह असल्याने पूजा तेथील लहान मुलांची इंग्रजी माध्यमातील गाणी म्हणायची. १२ वर्षांची होईपर्यत पूजाला कोणत्याच शाळेत घातले गेले नाही. शेवटी पूजाला चेंबूर येथील बालकल्याण नगरीमधील बालगृहात पाठवण्यात आले. बाल कल्याण नगरीच्या संस्थेत वयाच्या आधारावर थेट ५ वी इयत्तेत प्रवेश दिला गेला. ७ वीच्या इयत्तेत असताना वयानुसार खरे तर ती दहावीत असायला पाहिजे होती. हे कळल्यावर शाळेतल्या शिक्षकांनी पूजाला थेट दहावीत प्रवेश दिला. पूजा पहिल्यापासून अभ्यासात चांगली असल्याने दहावीत ती चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाली. पूजा दहावीत असताना अठरा वर्षांची होती. त्यामुळे पूजाला आता बालगृह सोडावे लागणार होते. संस्थेचे एक देणगीदार होते. त्यांची स्वतःची एक संस्था होती. तिथे ते १८ वर्षांवरील मुलींना त्यांच्या संस्थेत ठेवून घेत आणि पुढचे शिक्षण देत. त्यामुळे वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर पूजा आणि तिच्यासोबतच्या आणखी पाच मुलींची रवानगी या देणगीदाराच्या संस्थेत झाली.
पूजा म्हणते, ' शिक्षणासाठी म्हणून आम्हाला त्यांनी नेले खरे. अकरावीत प्रवेशही घेऊन दिला. पण तिकडे गेल्यावर आम्हा पाचजणींना ते कुणाच्या तरी शेतात शेतमजूर म्हणून पाठवणे, वसतिगृहात आल्यावर अगरबत्ती निर्मितीचे काम करायला लावणे, गायीम्हशीं सांभाळायला लावणे, पहाटे उठून दूध काढायला लावणे, असे प्रकार सुरु झाले. केलेल्या कामाचे पैसेही ते स्वतःकडे ठेवत. एकेदिवशी आमच्या पाचजणींपैकी पैकी दोन मुली अचानक गायब झाल्या व एकीवर तेथील संचालकांनी अतिप्रसंग केला. तेव्हा आम्ही तिघींनी आमच्या बालकल्याण नगरीच्या बालगृहाकडे तक्रार केली. तेव्हा त्यांच्यावर पोलीस केस होऊन न्यायालयाने शिक्षाही ठोठावली. कोर्टाने मग आमच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी महिला बाल विकास विभागाच्या कोकण विभागाकडे दिली. त्यावेळी तिथे विभागप्रमुख असलेल्या भवानी सरांनी विभागाच्या माध्यमातून खूप आस्थेने आमच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. भवानी सरांनी आम्हा तिघींना नाशिकच्या मुलींच्या अनुरक्षण गृहात ( after care ) दाखल केले. तिथे राहून बारावीची परीक्षा दिल्यावर नर्सिंगला प्रवेश घेतला. नंतर मला मुंबईत टाटा हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली. वर्किंग वुमन हॉस्टेलवर राहून मी थोडेथोडे पैसे साठवून नाशिकला माझ्या मानलेल्या आईकडे येत असे. माझे ते एकमेव माहेरघर होते. मी एका मॅट्रिमोनिअल साईटवर लग्नासाठी माझा अर्ज दाखल केला. या साईटवर काही लोकं खोटी माहिती लिहतात, याचेही मला ज्ञान नव्हते. साईटवर एक अकाउंटंट मॅनेजर मुलगा आवडलाही. आमची ओळख झाली. याबाबत 'अनाथांचा बाप' म्हणून सामाजिक काम करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याला मी सांगितले. कारण तोही बालगृहात वाढला असल्याने माझ्या भावना तो नीटसे समजून घेईल असे वाटले. त्यामुळे मी नवरा म्हणून निवडलेल्या व्यक्तीबाबत सांगितले. त्याने खुष होऊन कोणतीही शहानिशा न करता माझे मोठा गाजावाजा करीत लग्न लावले. लग्नानंतर कळले की तो मुलगा साधा ड्रायव्हर आहे. मी तेही स्वीकारले. काही दिवस सुखाचे गेले. पण काही महिन्यानंतर माझा पगार पूर्ण संसारतच घरभाडे भरण्यात, सासरी काही पैसे पाठवण्यात जाऊ लागला. माझ्या बसप्रवासापुरतेही माझ्याकडे पैसे शिल्लक नसायचे. त्याचे दारू पिऊन मारहाण करणे, जीवानिशी मारण्याची धमकी देणे, संशयी होणे, माझ्याच पगाराचा माझ्याकडे हिशोब मागणे, माझ्याकडील सर्व पैसे हडप करून ते दारूत उडवणे चालू झाले. मला निराशेने ग्रासले होते. आत्महत्या करावीशी वाटायची.'
यानंतर एका कार्यशाळेच्या निमित्ताने पूजाचा सनाथ फाऊंडेशन या संस्थेशी संबंध आला आणि तिचा जगण्याकडे बघण्याचा द्दष्टिकोन बदलला. सनाथ संस्थेने तिला भावनिक, मानसिक आधार तर दिलाच पण पुढच्या शिक्षणासाठी बळही दिले. कारण आर्थिकद्दष्ट्या स्थिर व्हायचे असेल तर पूजाला पुढचे शिक्षण घेणे आवश्यक होते. रडत बसून परिस्थिती बदलणार नाही, हे लक्षात आल्यावर पूजाने सांसारिक पाश कायमचे तोडले.
नर्सिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पूजा डी व्हाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये नर्स म्हणून नोकरीला लागली. पण तेवढ्यावर समाधान न मानता पूजाने नर्सिंगमधले पुढचे पीबीबीएससी हे शिक्षण घेतले. नवऱ्याच्या मारहाणीत दुखापत झालेल्या पायाचे ऑपरेशनही तिने पैसे साठवून करुन घेतले. पीबीबीएससी हा नर्सिंगचा अभ्यास पूर्ण झाल्यावर पूजाने नोकरी सांभाळत आयसीएमआर ही शासकीय परिचारिकेचीही परीक्षा दिली. त्यातही ती अव्वल क्रमांकाने पास झाली. कोविडकाळात पूजाचे नर्सिंगचे ज्ञान पाहून, तिचे रुग्णांसोबत असलेले प्रेमळ नाते, रुग्णांची ती घेत असलेली काळजी आणि तत्परता पाहून पूजाला डी व्हाय पाटील हॉस्पिटलमध्ये ‘रिसर्च हेड नर्स’ म्हणून बढतीही मिळाली. कोविड काळापासून तिला दिलेल्या जबाबदारीचे तिने सोनं केले. इतकेच नव्हे, तर यादरम्यान पूजा पीबीबीएससी नर्सिंग विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाली.
पूजा म्हणते, 'आता मला मागे वळून पहायचे नाही. आजपर्यंत ज्या लोकांनी माझ्या वाटचालीत सहकार्य केले त्यांची मी आभारी आहे.’ पूजाने नोकरी, शिक्षण सांभाळून एमपीएससीची परीक्षा दिली आणि आता ती शासकीय परिचारिका म्हणून रुजू झाली आहे. या दरम्यान तिचा परिचयोत्तर विवाहही पार पडला. पूजाचा नवरा कॉम्पुटर इंजिनिअर आहे. दोघेही आनंदात संसार करीत आहेत. पण आहे तिथेच न थांबता स्वबळावर परदेशात जाऊन शिकायचे पूजाचे स्वप्न आहे. परदेशी शिक्षण पूर्ण केल्यावर भारतात परत येऊन नर्सिंग कॉलेजची प्राध्यापक होण्याचा किंवा नर्सिंगमध्ये डॉक्टरेट करण्याचा तिचा विचार आहे. पूजाला संघर्षाचे काही वाटत नाही. संघर्षातूनच जीवन आकार घेते हे तिने स्वत:च्या उदाहरणाने दाखवून दिले आहे.